Pune Metro: पुणेकर लवकरच अनुभवणार भुयारातून मेट्रो प्रवास; जमिनीखाली मेट्रोची यशस्वी चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 07:47 PM2022-12-06T19:47:32+5:302022-12-06T19:49:08+5:30
शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट ३ किमी अंतर पार
पुणे : मेट्रोची भूयारातील चाचणी मंगळवारी दुपारी घेण्यात आली. ती यशस्वी झाली. शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट या ३ किलोमीटर अंतराच्या भूयारातून मेट्रो व्यवस्थित धावली. जमीनीच्या खाली २८ ते ३० मीटर खोलीवर हे भूयार आहे. आता सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा ३ किलोमीटर अंतराचा टप्पा शिल्लक राहिला असून तोही लवकरच घेण्यात येईल.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी ही माहिती दिली. पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गांवरील भूयारी मार्गाचा ६ किलोमीटरचा टप्पा हा तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होता. जमिनीखाली २८ते ३० मीटर अंतरावर सलग ६ किलोमीटर अंतराचे भूयार खोदायचे होते. तेही वरील कोणत्याही वास्तूला बाधीत न करता. त्यामुळे सर्व प्रकारच्या तांत्रिक चाचण्या झाल्यानंतरच हे काम सुरू करण्यात आले. आता पूर्ण ६ किलोमीटर अंतराची दोन भूयारे तयार असून त्यातील ३ किलोमीटर अंतरावरील चाचणीही यशस्वी झाली असल्याचे डॉ. दीक्षित म्हणाले.
रेंजहिल डेपोमधून चाचणीस दुपारी ३ वाजता सुरूवात झाली. शिवाजीनगरमध्ये असलेल्या भूयारात शिरण्याआधीचा मेट्रोचा उतार रेंजहिल डेपोपासून सुरू होतो. मागील आठवड्यापासून मेट्रोचे ट्रॅक, विद्यूत, सिग्नलिंग, देखरेख, दुरूस्ती असे सर्व विभाग कार्यरत होते. प्रत्यक्ष चाचणीस सुरूवात झाल्यानंतर कसलाही अडथळा न येता मेट्रो सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंत पोहचली व तिथून परतही आली. वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोच्या दोन मार्गांचे आता ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. स्थानकांच्या कामाला गती देण्यात आली आहे. येत्या महिनाभरातच फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट व वनाज ते सिव्हिल कोर्ट हे दोन्ही मार्ग प्रवाशांसाठी खुले करण्यात येतील असे महामेट्रोच्या वतीने सांगण्यात आले.