पुणेकरांचे आस्तेकदम...
By admin | Published: July 12, 2016 02:10 AM2016-07-12T02:10:54+5:302016-07-12T02:10:54+5:30
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कार्यालयांकडे निघालेल्या पुणेकरांचा सोमवारी खोळंबा झाला. एकीकडे सकाळी नऊपासूनच मंदावलेल्या वाहतुकीमुळे वाहनांच्या लांबच
पुणे : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कार्यालयांकडे निघालेल्या पुणेकरांचा सोमवारी खोळंबा झाला. एकीकडे सकाळी नऊपासूनच मंदावलेल्या वाहतुकीमुळे वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगा आणि दुसरीकडे जोरदार कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे पुणेकरांची दमछाक झाल्याचे चित्र संपूर्ण शहरात दिसून आले.
विशेष म्हणजे संभावित वाहतूककोंडी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांची उपस्थिती जवळपास प्रत्येक चौकात दिसत असतानाही, बेशिस्त पार्किंग, वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांमुळे या कोंडीत आणखीच भर पडल्याचे दिसत होते. कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, गणेश खिंड रस्ता, पाषाण, जुना पुणे-मुंबई महामार्ग, औंध, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, नगर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, नेहरू रस्ता, फर्ग्युसन रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, या प्रमुख रस्त्यांवर तर वाहनांच्या लांबच लांब रांगा दुपारी एकपर्यंत होत्या.
रविवारी मध्यरात्रीपासूनच पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने शहरात अनेक चौकांमध्ये पाण्याची तळी साचलेली होती. त्यातच रस्त्यांच्या कडेला चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने दुचाकी चालकांनाही रस्त्याच्या कडेने जाणे शक्य नसल्याने एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाहने मुख्य रस्त्यावर आली होती. त्यात दुहेरी वाहतूक असलेल्या अनेक रस्त्यांवर समोरून येणाऱ्या वाहनांकडून लेन कटिंग करून वाहने आडवी आणली जात असल्याने दुसऱ्या बाजूचेही रस्ते वाहतुकीसाठी बंद झाल्याचे चित्र विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, टिळक रस्ता या ठिकाणी दिसून आले. त्यामुळे अनेकांनी मिळेल त्या रस्त्याने कार्यालय गाठले.
पोलीस असूनही खोळंबा
संततधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणचे वाहतूक नियंत्रक दिवे बंद होते. त्यातच आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने होणारी संभाव्य वाहतूककोंडी लक्षात घेऊन अनेक ठिकाणी सकाळपासूनच वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही बेशिस्त वाहनचालक आणि रस्त्याच्या कडेला साठलेले पाणी तसेच खराब रस्त्यांमुळे वाहनांचा वेग मंदावल्याने सर्वच ठिकाणी वाहतूककोंडी दिसून आली.
अनेक ठिकाणी वाहतूक नियंत्रक दिवे सुरू असूनही बहुतांश वाहनचालक पोलिसांच्या समोरच लाल सिग्नल लागल्यानंतरही वाहने घेऊन जात असल्याने इतर वाहनांना अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र होते. सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, विद्यापीठ रस्ता, बाजीराव रस्ता तसेच शिवाजी रस्त्यावर रिक्षाचालक वाहतूक कोंडीतही प्रवासी घेण्यासाठी चौकाच्या परिसरात गर्दी करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर पोलीस असूनही वाहतुकीचा खोळंबा असल्याचे चित्र होते.पावसाने अनेकांची तारांबळ उडाली
रात्रभर सुरू असलेल्या पावसाने सकाळी आठनंतर काही वेळ विश्रांती घेतली होती. त्यामुळे दुचाकी काढून कार्यालय गाठण्याच्या लगबगीने अनेक जण बाहेर पडले होते. मात्र, सकाळी साडेनऊनंतर पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. जवळपास तासभर या पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे अचानक आलेल्या या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. रेनेकोट घातलेल्यांचा पावसातही प्रवास सुरू होता. जागा मिळेल तिथे थांबून पावसाचा जोर ओसरण्याची वाट पाहावी लागली. अनेकांनी तर वाहने रस्त्यावरच लावून रिक्षाने पुढचा प्रवास करत कार्यालय गाठले.