Temperature Increases: पुणेकरांनो काळजी घ्या! पुढील दोन दिवसात उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 01:55 PM2022-03-29T13:55:17+5:302022-03-29T13:55:29+5:30
पुणे : पश्चिम व मध्य भारतात उष्णतेची लाट आली असून, त्याचा परिणाम गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम राजस्थान, मराठवाडा व ...
पुणे : पश्चिम व मध्य भारतात उष्णतेची लाट आली असून, त्याचा परिणाम गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम राजस्थान, मराठवाडा व विदर्भात कमाल तापमान ४०-४१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. पुढील दोन दिवसांत पुण्याचेही कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मध्य महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पुण्यात सध्या ढगाळ हवामान असून, कमाल तापमान ३८.६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २०.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सरासरीच्या तुलनेत रात्रीच्या तापमानात ३.२ अंशांनी वाढ झाली आहे. ढगाळ हवामानामुळे वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उकाडा वाढला आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका जाणवत असतानाच सायंकाळी नेहमी सुटणारे वारे नसल्याने जीव कासावीस होत असल्याचा अनुभव सध्या पुणेकरांना येत आहे.
देशातील मध्य व पश्चिम भागात आलेल्या उष्णतेच्या लाटेचा परिणाम पुण्यात पुढील दोन दिवसांत जाणवण्याची शक्यता आहे. बुधवारी पुण्यातील कमाल तापमान ४० अंशांवर जाण्याची शक्यता आहे. त्याच वेळी रात्रीच्या तापमानात २४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.