पुणेकरांची पसंती पुरोगामी विचारांनाच
By Admin | Published: February 16, 2017 03:33 AM2017-02-16T03:33:00+5:302017-02-16T03:33:00+5:30
पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सन २००७ मध्ये अगदी पहिल्यांदा सत्ता आली त्या वेळी मी पक्षाचा शहराध्यक्ष होतो. त्यानंतरची ५ वर्षे
पुणे : पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सन २००७ मध्ये अगदी पहिल्यांदा सत्ता आली त्या वेळी मी पक्षाचा शहराध्यक्ष होतो. त्यानंतरची ५ वर्षे आम्ही अनेक विकासकामे केली. त्यामुळेच पुणेकरांनी पुन्हा सन २०१२ मध्ये सत्ता दिली. आता गेल्या ५ वर्षांच्या कामांच्या बळावर आम्ही पुन्हा एकदा पुणेकरांसमोर आहोत, तेही केलेल्या कामांच्या बळावरच व पुणेकर पुन्हा आम्हालाच पहिल्या क्रमांकाची पसंती देतील, असा माझा विश्वास आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे. काँग्रेसची पुढची पायरी असे मी म्हणेल. आयटीसारख्या अत्याधुनिक क्षेत्राचा पुण्यात विकास व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले, ही एकच गोष्ट आम्ही आधुनिक विचारांचे आहोत हे सिद्ध करण्यास पुरेशी आहे. अनेक युवकांना यामुळे रोजगार मिळाला. बाहेरून अनेक युवक पुण्यात आले व त्यांनी आपले आयुष्य घडविले. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा हा दृष्टिकोनच लाखो मतदारांना पक्षाशी जोडण्यासाठी उपयोगी पडतो आहे.
महापालिकेची निवडणूक स्थानिक विषयांवर लढली जाते हे खरे आहे. मात्र, पुण्यासारख्या शहराला जगाच्या नकाशावर न्यायचे असेल तर विचारही तसेच असावे लागतात. ते राष्ट्रवादी काँग्रेसने दाखविले. महापालिकेतील सत्ता जनहितासाठीच राबविली गेली. त्यामुळेच जुन्या पुण्याचा चेहरा गेल्या १० वर्षांत बदलला. केंद्र सरकार तसेच जगातील अनेक देशांमध्ये पुणे शहराचे नाव अग्रभागी असते ते आम्ही केलेल्या विकासकामांमुळेच, असा माझा दावा आहे. भाजपाने आमच्या प्रत्येक कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आमचे विचार स्वच्छ असल्यानेच आम्ही मागे हटलो नाही. महापालिकेतील नेतृत्वाला पक्षातील नेत्यांचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे त्या अडथळ्यांचा काही उपयोग झाला नाही.
जगाच्या आजच्या स्थितीत धर्मवादी, पंथवादी, जातवादी विचार कालबाह्य झाले आहेत असे मला वाटते. या प्रतिगामी विचारांवर चालणाऱ्या पक्षांना सत्ता मिळाली तर पुण्याचे नुकसान होईल. त्यामुळे आम्ही काँग्रेस या समविचारी पक्षाबरोबर आघाडी केली आहे. त्यामुळे आता मतांचे विभाजन होणार नाही व
त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होईल, असे मला वाटते. सत्तेच्या गेल्या १० वर्षांच्या काळात शहरामध्ये विविध विकासकामे झाली. मूलभूत सुविधा, भविष्यातील समस्या यांचा वेध घेत सध्याची विकासकामे केली जातात. असा दृष्टिकोन सत्तेच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवला आहे. त्याला पुणेकरांची साथ मिळेल, असा मला विश्वास आहे.