पुणेकरांनो रक्तदान करा! डेंग्यू, चिकुनगुनिया वाढला; प्लेटलेट्सच्या मागणीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 02:47 PM2024-09-09T14:47:15+5:302024-09-09T14:49:27+5:30
निरोगी दात्याच्या रक्तातून प्लेटलेट्स काढण्याच्या प्रक्रियेस दोन ते अडीच तास लागतात
पुणे: शहरात डेंग्यू आणि चिकुनगुनिया आजारांच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, त्यामुळे रुग्णांमध्ये प्लेटलेट्सची संख्या कमी होत आहे. सध्या सर्वच रुग्णालयांमध्ये तसेच रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्सची मागणी वाढली आहे. त्यातच रक्तदान शिबिरे कमी झाल्याने रक्ताची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे.
डेंग्यूची लागण झाल्यास बहुतेकदा रुग्णांमध्ये प्लेटलेट्स देखील कमी होतात. या प्लेटलेट्स ३० हजार ते १० हजार दरम्यान झाल्यास शक्यतो रुग्णांना सलाईनद्वारे प्लेटलेट्स देण्याची गरज पडते. जरी प्रत्येक रुग्णाला प्लेटलेट्सची गरज पडत नसली तरी ती सलाईनद्वारे देण्याची गरज पडू शकते. रक्तदानानंतर रक्ताचे विघटन करून प्लेटलेट्स वेगळ्या केल्या जातात; मात्र प्लेटलेट्सचा साठा पाच दिवसच करता येतो. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात डेंग्यू आणि पावसाळी आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने मागणी वाढली आहे, त्या तुलनेत रक्तदान हाेत नसल्याने प्लेटलेट्सचा तुटवडा जाणवत असल्याचे त्यांचे मत आहे.
का हाेतात प्लेटलेट्स कमी?
प्लेटलेट्स घटल्यामुळे रक्तस्रावाचा धोका वाढताे. कारण जखम झाल्यावर रक्त वाहत असल्यास त्या ठिकाणी प्लेटलेट जमा हाेऊन ताे रक्तप्रवाह राेखतात; परंतु डेंग्यूच्या विषाणूमुळे रक्ताच्या घटकांचे, विशेषत:, प्लेटलेटचे उत्पादन करणाऱ्या अस्थिमज्जा पेशींचा संसर्ग होऊ शकतो. शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने प्लेटलेट्सवर हल्ला होतो. त्यामुळेही संख्या कमी होते. त्यामुळे रक्तप्रवाहातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते.
प्लेटलेट्सच्या मागणीत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली असून १५ ऑगस्टनंतर रक्तदान शिबिरेही हव्या त्या प्रमाणात झालेली नाहीत. रक्त ३५ दिवसांपर्यंत टिकत असले तरी प्लेटलेट्स ५ दिवसांपर्यंतच टिकू शकतात. तसेच, निरोगी दात्याच्या रक्तातून प्लेटलेट्स काढण्याच्या प्रक्रियेस दोन ते अडीच तास लागतात. यावेळी प्लेटलेट्सच्या मागणीत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे रक्तपेढ्यांनी सांगितले.
‘रक्ताचे नाते’ ट्रस्टचे राम बांगड म्हणाले की, प्लेटलेट्सच्या एका बॅगची किंमत ११ ते १५ हजार रुपये आहे. किमतीचे प्रमाणीकरण करण्यासाठी शासनाने यावर विचार करण्याची गरज आहे. आमच्याकडे प्लेटलेट्सच्या मागणीसाठी दिवसाला ५० फोन येत आहेत. प्लेटलेट्सचा तुटवडा कमी होण्यासाठी रक्तदात्यांनी पुढे यावे.