पुणेकरांची स्वप्ने अडकली सर्वेक्षणातच: रेल्वे विद्यापीठही वडोदऱ्याने पळविले
By admin | Published: February 25, 2016 08:06 PM2016-02-25T20:06:07+5:302016-02-25T20:07:55+5:30
पुणेकरांना गेल्या अनेक वर्षांपासून दाखविली जात असलेली स्वप्ने यंदाच्या वर्षीही सर्वेक्षणातच अडकली असून त्यासाठीही काही लाखांच्या तरतूदी रेल्वे अंदाजपत्रकात करण्यात आले आहे.
पुणे : पुणेकरांना गेल्या अनेक वर्षांपासून दाखविली जात असलेली स्वप्ने यंदाच्या वर्षीही सर्वेक्षणातच अडकली असून त्यासाठीही काही लाखांच्या तरतूदी रेल्वे अंदाजपत्रकात करण्यात आले आहे. रेल्वे विद्यापीठ पुण्यात होणार अशी अपेक्षा असताना ते वडोदऱ्याने पळविले आहे. पुणे आणि परिसरासाठी गेल्या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात केवळ सर्वेक्षणाच्याच घोषणा केल्या होत्या. त्यासाठी तरतूदही काही लाख रुपयांचीच करण्यात आली होती. यंदाही नेमके तेच झाले आहे. पुणे- कोल्हापूर आणि पुणे-मनमाड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. पुणे- कोल्हापूरसाठी २४ लाख १२ हजार तर पुणे- मनमाड मार्गासाठी केवळ ५ लाख ४३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे- नगर अंतर कमी करणाऱ्या नव्या मार्गाच्या सर्वेक्षणासाठीही केवळ १३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या पुणे- बारामती रेल्वेमार्ग अस्तित्वात असला तरी व्हाया दौंड वळसा घालून जावे लागते. सासवड- जेजुरी- मोरगावमार्गे दीड तासांत अंतर कापू शकणाऱ्या या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी केवळ साडेचार लाख रुपयांची तरतूद आहे. कर्जत - लोणावळा चौथ्या मार्गाच्या सर्व्हेक्षणासाठी ९ लाख ९२ हजार, कल्याण - कर्जत तिसऱ्या मार्गाच्या सर्व्हेक्षणासाठी १० लाख २८ हजार रुपये तरतूद आहे. पुणे -नाशिक मार्ग तर रेल्वे विभागाकडूनच साईडींगला टाकण्यात आला आहे. या मार्गासाठी केवळ ३ लाख १९ हजार रुपये तरतूद केली आहे. पुणेकरांना अपेक्षा असलेल्या कोणत्याही मार्गाचे प्रतिबिंब रेल्वे मंत्र्यांच्या भाषणात दिसलेले नाही. पुण्याला रेल्वे विद्यापीठ व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती़ पण, हे विद्यापीठ वडोदऱ्याला मिळाल्याने मागणीला पाने पुसली असल्याची भावना पुणेकरांनी व्यक्त केली़ पुणे महानगर विकास प्राधीकरणाची स्थापना झाल्यानंतर या भागाच्या विकासासाठी रेल्वेचा फार मोठा सहभाग असणार आहे. यासाठी लोणावळा-पुणे-दौंड, पुणे- सातारा मार्गाला उपनगरीय दर्जा देण्याची मागणी होती. मात्र, याबाबत विचारही झाला नाही. पुणे-लोणावळा तिसऱ्या मार्गाच्या कामासाठी निधीचीही तयार झाली आहे. पीएमआरडीए, पुणे महानरपालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी यासाठी निधीचा हिस्सा देण्याची तयारी केली होती. मात्र, रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गासाठी निधी ठेवण्यात आलेला नाही. पुण्याहून दक्षिणेकडे व राजस्थान, उत्तरेकडे जाणाऱ्या नव्या गाड्या मिळतील, अशी पुणेकरांना अपेक्षा होती़ पण, कोणत्याही नव्या गाड्यांची घोषणा न केल्याने पुणेकर नाराज झाले आहे़