पुणेकरांनी अनुभवली आल्हाददायक रात्र अन् सकाळ! थंड पश्चिमी वारे वाहत असल्याने हवेत गारवा
By श्रीकिशन काळे | Published: May 2, 2024 01:56 PM2024-05-02T13:56:58+5:302024-05-02T13:57:27+5:30
पश्चिमी थंड वारे वाहत असल्याने तापमानात घट झाल्याचे हवामानशास्त्रज्ञ डाॅ. अनुपम कश्यपी यांनी 'लोकमत' ला सांगितले....
पुणे : गेल्या महिनाभरपासून पुणेकर दिवसा आणि रात्री उकाड्याने हैराण झाले होते. त्यांना बुधवारी (१ मे) रोजीची रात्री या उकाड्यापासून दिलासा मिळाला. पश्चिमी थंड वारे वाहत असल्याने तापमानात घट झाल्याचे हवामानशास्त्रज्ञ डाॅ. अनुपम कश्यपी यांनी 'लोकमत' ला सांगितले.
राजस्थान-गुजरातहून उष्णवारे वाहत असल्याने पुण्यात व महाराष्ट्रात उकाडा अधिक जाणवत आहे. त्यामुळे किमान आणि कमाल दोन्ही तापमानात वाढ अनुभवायला मिळाली. दिवसरात्र उष्णतेने पुणेकर हैराण झाले. त्यांना बुधवारी (दि.१) रात्री दिलासा मिळाला. रात्री ११ नंतर अचानक थंड वारे वाहू लागले आणि पुण्यात थंडावा पसरला. हे थंड वारे पश्चिमेकडून येत आहेत. कोकणावरून पुढे पुण्याकडे वाहत असल्याने किमान तापमानात बरीच घट पहायला मिळाली. दररोज किमान तापमान २३-२४ अंश सेल्सिअस नोंदवले जात होते, ते आज सकाळी १८ अंशावर आले. त्यामुळे पुणेकरांची सकाळ आल्हाददायक झाली. परंतु आता हळूहळू पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता डाॅ. कश्यपी यांनी व्यक्त केली आहे.
पुणे शहरातील वडगावशेरी, हडपसर, मगरपट्टा, कोरेगाव पार्क या भागातील किमान तापमान ३० अंशापर्यंत गेले होते. तिथे देखील आता घट झाली आहे. तिथे आज २५-२६ अंशावर तापमानाची नोंद झाली आहे. तर शिवाजीनगरला १८.७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले.
पुण्यातील किमान तापमान
हडपसर - २६.२
वडगावशेरी - २५.६
मगरपट्टा - २५.१
कोरेगाव पार्क - २३.५
बारामती - २०.९
शिवाजीनगर - १८.७
लोणावळा - १५.६