पुणेकरांना वालीच कोणी नाही! 10-15 दिवस स्ट्रीट लाईट बंद, कचरा साचलेला; तक्रार करूनही कोणी येत नाही
By हेमंत बावकर | Published: June 12, 2023 10:54 AM2023-06-12T10:54:39+5:302023-06-12T10:56:22+5:30
Pune Problems due to Election Politics: नगरसेवक असताना जे प्रश्न दोन दिवसांत सोडविले जात होते, ते १०-१५ दिवस उलटले तरी सोडविले जात नाहीएत. यामुळे लवकर निवडणुका घ्या रे, अशी हाक आता पुणेकर देऊ लागले आहेत.
मुंबई, पुण्यासह राज्यभरातील पालिका निवडणुका राजकीय फायद्यासाठी रखडविण्य़ात आल्या आहेत. परंतू, यामध्ये नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. वालीच कोणी नसल्यासारखी पुणेकरांची अवस्था झाली आहे. वारंवार ऑनलाईन, ऑफलाईन तक्रारी करूनही अधिकारी, कर्मचारी सोडवत नसल्याचा अनुभव पुणेकरांना येत आहे. नगरसेवक असताना जे प्रश्न दोन दिवसांत सोडविले जात होते, ते १०-१५ दिवस उलटले तरी सोडविले जात नाहीएत. यामुळे लवकर निवडणुका घ्या रे, अशी हाक आता पुणेकर देऊ लागले आहेत.
पुण्यातील रहिवासी भागात मोठी समस्या येत आहे. कचरा तसाच रस्त्यावर साचलेला आहे. मच्छरांचा उपद्रव असल्याची तक्रार केली तरी फवारणी करण्यासाठी येत नाहीत. ऑनलाईन तक्रार केली तर ती परस्पर सोडविल्याचा स्टेटस दिसू लागतोय. यासाठी ना कोणी कर्मचारी येत ना कोणताही अधिकारी, टेबलवर बसुनच आम्ही तक्रार सोडविली असे लिहीले जातेय.
हा अनुभव गेल्या चार-पाच महिन्यांपासून येत आहे. ऑफलाईन तक्रार करूनही कोणी कर्मचारी जागचे ढीम्म हलत नाहीएत. पुण्यात ३१ मे रोजी झालेल्या वादळी पावसावेळी अनेक ठिकाणच्या रस्त्यावरील लाईट बंद झाल्या आहेत. पुणे आयटीपार्कजवळील रहिवासी भागात गेल्या १३ दिवसांपासून रात्रीच्यावेळी रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. तिथेच कचराही साचलेला आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांबरोबरच चोऱ्या माऱ्या होण्याची भीती येथील रहिवाशांना वाटत आहे. अनेकदा तक्रारी करून पालिकेचे अधिकारी, कर्मचारी येत नाहीएत. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
मग फायदा काय?
पुणे पालिका डिजिटल झाल्याची टिमकी मिरवत आहे. परंतू, ट्विटवर फोटो, पुराव्यांसह तक्रार केली, पुणे पालिकेच्या अॅपवर तक्रार केली तरी दखल घेतली जात नाहीय. ती तक्रार पुढे ढकलली जाते, इंजिनिअर किंवा अधिकारी असाईन केला जातो, परंतू ती तशीच पडून राहत आहे. मग या ऑनलाईन प्रणालीचा फायदा काय असा प्रश्न पुणेकर विचारू लागले आहेत.