Pune: पुणेकर खड्ड्याभोवती रांगोळी काढून घालतोय हार; अनोखं कृत्य, नेमका उद्देश काय?
By राजू हिंगे | Published: June 14, 2023 02:06 PM2023-06-14T14:06:20+5:302023-06-14T14:21:49+5:30
या खड्ड्याला हार अर्पण करून अनोखे आंदोलन...
पुणे : शहरातील अनेक रस्त्यावर पावसाळा सुरू होण्यापुर्वीच खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे हे खड्डे दुरूस्ती करावी या मागणीसाठी एका नागरिकाने महर्षी कर्वे पुतळा चौकात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर खड्ड्याच्याभोवती रांगोळी काढली आहे. या खड्ड्याला हार अर्पण करून अनोखे आंदोलन केले आहे.
पुणे महापालिकेने पावसाळा सुरू होण्यापुर्वी शहरातील रस्त्याची कामे मोठयाप्रमाणात केली आहेत. तरीही शहराच्या अनेक भागातील रस्त्यावर खडडे पडलेले आहेत. पावसाळा सुरू झाल्यावर खडडे मोठया प्रमाणात पडतात. त्यामुळे पावसाळयापुर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवावे या मागणीसाठी संतोष पंडित या नागरिकाने महर्षी कर्वे पुतळा चौकातील खड्ड्याभोवती अनोखे आंदोलन केले आहे. या नागरिकांने खड्ड्याच्या भोवती रांगोळी काढून हार अर्पण करून हात जोडून आंदोलन केले आहे.
शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे दुरूस्त करण्याचे काम पालिकेने केले पाहिजे. पण पालिका हे काम वेळेत करत नाही. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करतात, त्यांचे नेते पंतप्रधानांच्या फोटोचा वापर करतात. आमदार त्यांच्या हददीतील खड्डे बुजवित नाहीत असेही संतोष पंडित यांनी सांगितले.