"शिवाजीनगरचा नामविस्तार 'छत्रपती शिवाजी महाराज नगर' करावा", महापालिकेला पुणेकरांची विनंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 16:52 IST2021-06-08T16:52:25+5:302021-06-08T16:52:36+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी केली मागणी

"शिवाजीनगरचा नामविस्तार 'छत्रपती शिवाजी महाराज नगर' करावा", महापालिकेला पुणेकरांची विनंती
धनकवडी: छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचा योग्य तो सन्मान राखणे गरजेचे आहे. महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी पुणे शहरातील प्रसिद्ध अशा 'शिवाजीनगर' चा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज नगर” असा करण्यात यावा, अशी मागणी समस्त पुणेकरांच्या वतीने सिद्धी कर्मयोगी फाउंडेशनने केली.
दादरचे ऐतिहासिक शिवाजी पार्क देखील आता 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' म्हणून ओळखले जाणार आहे. तसा प्रस्ताव देखील मुंबई महानगरपालिकेने पारित केला आहे. त्याच धर्तीवर शिवाजीनगर चा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज नगर” असा करण्यात यावा, हेच यंदाच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य ठरेल.
यासंदर्भातील निवेदन सिद्धी कर्मयोगी फाउंडेशनतर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, महापौर, पुणे महानगरपालिका, सहआयुक्त, पुणे महानगरपालिका ह्याना पाठवण्यात आले असल्याचे फौंडेशनचे अध्यक्ष रघुनाथ येमुल यांनी सांगितले आहे.