पुणेकरांनो ऑनलाईन फसवणुक झाल्यास तातडीने संपर्क साधा; पोलिसांकडून २ मोबाईल नंबर जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 10:51 AM2021-07-13T10:51:25+5:302021-07-13T10:51:36+5:30
अपघात किंवा ऑनलाईन फसवणुकीचा व्हॉट्सअप मोबाईल नं. ७०५८७१९३७१/७०५८७१९३७५ वर संपर्क साधा
पुणे: अपघातात एखादा जखमी झाला तर त्याला तातडीने मदत केल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. पहिल्या एक तासाला गोल्डन अवर म्हटले जाते. त्याचप्रमाणे ऑनलाईन शॉपिंग, पेमेन्ट करताना फसवणूक झाल्यास नागरिकांनी तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. त्याठी दोन व्हॉटसअप मोबाईल नंबर जाहीर करण्यात आले आहेत. या क्रमांकावर फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधल्यास तातडीने कारवाई करणे शक्य होणार आहे.
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारात फसवणूक करुन पैसे काढून घेतले जातात. नागरिकांना तात्काळ कोठे तक्रार करायची याची पूर्ण माहिती नसते. त्यामुळे नागरिकांना सायबर पोलिसांपर्यंत पोहोचण्यास विलंब झाल्याने सायबर चोरटे तातडीने पैसे त्यांच्या बँक खात्यातून/वॉलेटमधून काढून घेतो. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्यांचे टि्वटर अकाऊंटद्वारे जनजागृती मोहिम सुरु केली आहे. त्यांनी हे ७०५८७१९३७१/७०५८७१९३७५ दोन व्हॉटसअप मोबाईल नंबर जाहीर केले आहेत.
पोलिसांना अशा प्रकारे सांगावी फसवणूक झाल्याची माहिती
पुणे शहरातील नागरिकांची ऑनलाईन फसवणूक झाल्यास त्यांनी तात्काळ या मोबाईल नंबरवर संपर्क साधून त्यांच्या सोबत फसवणूकीचा झालेला प्रकार सांगावा. त्यानंतर सायबर पोलीस त्या फसवणूकीच्या व्यवहाराची कोणती माहिती पोलिसांना पुरवायची ते सांगतील. त्यानंतर ते व्यवहार थांबवण्यासाठी झालेल्या फसवणूकीच्या क्रमांक व लिंक स्क्रीनशॉट्स, डेबिटबाबत प्राप्त झालेले मेसेजेस, बँकेचे नाव, खाते क्रमांक, डेबीट कार्ड/ क्रेडीट कार्ड क्रमांक व लिंक मोबाईल नंबर इत्यादी माहिती सायबर पोलिसांच्या व्हॉटसअप क्रमांकावर पुरवावेत. त्यानंतर सायबर पोलीस फसवणूकीत त्यांचे खात्यातून वळती झालेली रक्कम देशभरातील संबंधित बँक/ वॉलेटमध्ये गोठवून ठेवण्यासाठी कळवितात. त्यामुळे नागरिकांचे झालेल्या फसवणूकीतील व्यवहारातील पैसे परत मिळवता येतात.
नागरिकांनी कोणाचेही सांगण्यावरुन मोबाईल क्लोन ॲप डाऊनलोड करु नये. कोणत्याही अनाधिकृत लिंक ओपन किंवा शेअर करु नये. मोबाईलवर आलेला ओटीपी, क्रेडिट, डेबीट कार्डची माहिती शेअर करु नये. तसेच ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ वरील क्रमांकावर संपर्क साधावा. संबंधित बँकेचे अधिकृत हेल्पलाईन खात्रीशीर माहिती असल्याशिवाय माहिती देऊ नये. गुगलसारख्या सर्च इंजिनवरील कस्टमर केअरचा क्रमांकावर माहिती देऊ नये. तो क्रमांक चोरट्याने रजिस्टर केलेला असून शकतो, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.