गुजरातच्या कांद्याकडे पुणेकरांनी फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:20 AM2021-03-04T04:20:23+5:302021-03-04T04:20:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात कांद्याचे दर वाढल्याने मोठ्या प्रमाणात गुजरात येथून मोठ्या प्रमाणात कांदा मागविण्यात आला. महाराष्ट्रातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात कांद्याचे दर वाढल्याने मोठ्या प्रमाणात गुजरात येथून मोठ्या प्रमाणात कांदा मागविण्यात आला. महाराष्ट्रातील कांद्यापेक्षा हा कांदा स्वस्त असला तरी पुणेकरांनी या कांद्याकडे पाठ फिरवली आहे. गरवी, नाशिक कांद्याला ग्राहकांची सर्वाधिक पसंती देत आहेत. दरम्यान लाॅकडाऊनच्या शक्यतेने गेल्या काही दिवसांपासून मार्केट यार्डातील कांद्याची आवक कमी झाली असल्याने दरामध्ये वाढ झाली असल्याची माहिती कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.
मार्केट यार्डात कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे रविवारच्या तुलनेत कांद्याच्या दरात घाऊक बाजारात किलोमागे ४ रुपयांनी, तर शुक्रवारच्या (दि.२६) तुलनेत ६ रुपयांनी वाढ झाली आहे. स्थानिक कांद्याला घाऊक बाजारात दर्जानुसार किलोस २५ ते २९ रुपये दर मिळत आहे. तर, गुजरातच्या कांद्याला १० ते १५ रुपये दर मिळत आहेत. दरम्यान, किरकोळ बाजारात स्थानिक कांद्याला किलोस प्रतवारीनुसार ४० ते ६० रुपये दर मिळत आहे. गुजरातच्या पांढऱ्या कांद्यास ३० ते ४० रुपये दर मिळत असल्याची माहिती मार्केट यार्डातील किरकोळ विक्रेते संघटनेचे प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.
पोमण यांनी सांगितले की, मागील तीन आठवड्यापासून या कांद्याची आवक होत आहे. मात्र, ग्रेव्ही होत नसल्याने हॉटेल विक्रेते हा कांदा खरेदी करत नाहीत. केवळ स्वस्त मिळतय म्हणून काही ग्राहक खरेदी करतात. सध्या स्थानिक कांद्याचा गरवीचा हंगाम सुरू आहे. पुरंदर, शिरूर, हवेली, खेड, मंचर, राजगुरूगनगर, जुन्नर, दौंड भागातून मार्केट यार्डात कांद्याची आवक होत आहे. मागील आठवड्यात गुजरातच्या कांद्याची झालेली आवक, हवामानातील बदल आणि लॉकडाऊन लागेल, बाजार समित्या बंद होतील, या भीतीने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीस बाजारात आणला. दररोज सुमारे १०० गाड्यांची आवक होती. होणाऱ्या आवकमध्ये अपरिपक्व आणि कच्चा कांद्याचे प्रमाणही होते. त्यामुळे कांद्याचे दर घसरले होते. शुक्रवारी (दि. २६) कांद्यास २० ते २३ रुपये भाव मिळत होता. मात्र, चव नसल्याने गुजरातच्या कांद्याला मागणी नाही. लॉकडाऊनची भीती कमी झाल्याने शेतकऱ्यांनी माल आणणे कमी केले आहे. मार्केट यार्डात दररोज सुमारे ५० ट्रक स्थानिक कांद्याची आवक होत आहे. ८ ते १० गुजरात कांद्याची आवक होत आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाली आहे.