पुणेरी मिसळ - मजेशीर विडंबन, पुण्यात आला गवा...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 08:46 PM2020-12-27T20:46:19+5:302020-12-27T20:47:54+5:30
बातमी : गुलाबी थंडीत रोमान्सच्या शोधात नर गवा एकटा फिरत पुण्यात आला होता. अशा गव्यांना ‘एकुल’ म्हणतात...त्यावरून सुचलेलं हे विडंबन...
- अभय नरहर जोशी
कोणास ठाऊक कवा,
पण पुण्यात आला गवा...
गवा म्हणे होता ‘एकुल’
प्रेमासाठी भलता व्याकूळ
गव्याने हलवले कान
पुणेकरांच्या कंठाशी प्राण
हंबरोनि घेतली त्याने तान
पुणेकरांची इकडे दाणादाण
कोणास ठाऊक कवा,
पण कोथरूडला गेला गवा
गवा म्हणे, 'दादा' छानच पुणे
कशाला पुन्हा कोल्हापूरला जाणे
'दादा' म्हणाले, रे भले शाब्बास
पुणेकर होण्याचा नसे मज ध्यास
गवा म्हणाला, पुणेकर व्हा खास
मलाही इथंंच सेटल व्हायची आस
कोणास ठाऊक कवा,
चितळेंकडे भरदुपारी गेला गवा
चितळेंना म्हणाला, खवा हवा
ते म्हणाले, संपला खवा, घरी जावा
गवा म्हणे, सांगाल घरचा पत्ता काही
चितळे म्हणे, विचारू नका काही बाही
दुपारी आम्हीच आम्हाला सापडत नाही
कोणास ठाऊक कवा,
पण कसब्यात गेला गवा
गव्याला भेटले खासदार ‘भाऊ’
गवा म्हणे, माझा पत्ता सांगा पाहू
'भाऊ' सांगू लागे, 'दिल्लीची महत्ता'
पण गल्लीत कटला माझाच पत्ता'
कोणास ठाऊक कवा,
'बारामती होस्टेला'त गेला गवा
तेथे भेटले 'कारभारी दादा'
त्यांना वेळ कमी नि काम जादा
गवा म्हणे, भरदिवसा सापडंना वाट
दादा म्हणे, ऐक माझा किस्सा भन्नाट
मीही चुकलो, तेव्हा होती पहाट
भलते प्रेम सोड, गिरव माझा कित्ता
आप्तांना सोडू नको, सापडेल तुला पत्ता
जंगलचीच गवीण बरी, बरं आपलं रान
तुझ्या भावानं पुण्यातच सोडलेत प्राण
कोणास ठाऊक कवा
दादांचं ऐकून उधळला गवा
जंगलातच पुन्हा परतुनी गेला
त्याचाच पुण्यात गवगवा झाला!
कोणास ठाऊक कवा,
पण पुण्यात आला गवा...
( लेखक 'लोकमत'च्या पुणे आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)