पुणेरी मिसळ : 'लहरी नियम, अधांतरी सरकार  म्हणे आता, मी जबाबदार!'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 11:51 AM2021-02-28T11:51:36+5:302021-02-28T11:52:54+5:30

Puneri Misal: 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' असे सांगून त्याच्यावर सगळी जबाबदारी टाकली गेली अन् आता 'मी जबाबदार' असे त्याला बजावले जात आहे, त्यानिमित्त...

Puneri Misal: I am responsible! | पुणेरी मिसळ : 'लहरी नियम, अधांतरी सरकार  म्हणे आता, मी जबाबदार!'

पुणेरी मिसळ : 'लहरी नियम, अधांतरी सरकार  म्हणे आता, मी जबाबदार!'

Next

ओसरलेल्या कोरोनाचं पुनरागमन झालंय. या साथीला आता वर्ष पूर्ण होईल. या काळात अनेक नियम, प्रतिबंधांना सामान्य माणूस सामोरा गेला. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' असे सांगून त्याच्यावर सगळी जबाबदारी टाकली गेली अन् आता 'मी जबाबदार' असे त्याला बजावले जात आहे, त्यानिमित्त...

धरुनि वेठीस समाज सारा
मंत्री घडविती स्व सत्कार
कोरोना करतो पुनरागमन
त्याला मात्र, मी जबाबदार! - १

गुंड काढती मिरवणुका
अन् मंत्री भरवती दरबार 
कायदे फक्त माझ्याचसाठी
मोडले तर, मी जबाबदार! - २

श्रीमंतांघरी विवाहसोहळे
वऱ्हाडींनी भरले घरदार
गरिबांना नियमांचा धोंडा
कर स्वीकार, मी जबाबदार! - ३

केंद्र म्हणते राज्यच दोषी
पेट्रोल गेले शंभरीपार
परस्परांवर कुरघोडीलाही 
खरे पाहता, मी जबाबदार! - ४

रात्री कोरोनाचा बागुलबुवा
बाहेर पडशील तर खबरदार 
दिवसा फिरलो, कुठेही गेलो
तरीही अखेर मी जबाबदार! - ५

नैतिकतेचे गिरवावे धडे 
तोच अपुला खरा आधार
पाप-पुण्याच्या हिशेबाला
असतो, फक्त मी जबाबदार! - ६

सर्रास नियम मोडणारे
फिरतात मोकाट, बेदरकार
चुकून नियमभंग झाला तरी
तू मान्य कर, मी जबाबदार! - ७

ओस शाळा-काॅलेज कट्टे
मुकी घंटा, थंड कारभार
पाल्याच्या संसर्गालाही
मी पालक, मी जबाबदार! - ८

राज्यकारभारी धाक दाखवी
लाॅकडाऊनची टांगती तलवार 
पुन्हा व्यवहार ठप्प झाल्यास
घरी बसण्यास, मी जबाबदार! - ९

माझे कुटुंब, माझी जबाबदारी
लहरी नियम, अधांतरी सरकार 
म्हणे आता, मी जबाबदार! 
पुन्हा, पुन्हा मीच जबाबदार! - १०

- अभय नरहर जोशी

Web Title: Puneri Misal: I am responsible!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे