Pro Kabaddi League : प्रो-कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटणचा शेवट गोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 19:40 IST2024-12-24T19:39:17+5:302024-12-24T19:40:12+5:30
तमिळ थलैवाजवर ४२-३२ अशी मात : गौरव खत्री, अमनचा भक्कम बचाव

Pro Kabaddi League : प्रो-कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटणचा शेवट गोड
पुणे : अखेरच्या पर्वात विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या पुणेरी पलटण संघाने नव्या अकराव्या पर्वातील अपयशाचा शेवट गोड करताना तमिळ थलैवाजवर ४२-३२ असा विजय मिळविला. या विजयाने पुणेरी पलटणची या पर्वातील मोहिम आठव्या क्रमांकाने पूर्ण झाली.
गतविजेते असल्यामुळे अपेक्षा उंचावलेल्या पुणेरी पलटण संघाला या वेळी चमक दाखवता आली नाही. यापूर्वीच आव्हान संपुष्टात आलेल्या पुणेरी पलटणने अखेरच्या सामन्यात मात्र आपल्या पाठिराख्यांना निराश केले नाही. आव्हान संपुष्टात आल्यानंतरही अखेरचा सामना चाहत्यांसाठी खेळण्याचा शब्द त्यांनी खरा केला.
लीगमध्ये केवळ दुसऱ्यांदा अंतिम सातमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यावर आर्यवर्धन नवलेने सुपर टेनची कामदगरी केली. व्ही. अजितकुमारनेही ७ गुण मिळवून त्याला सुरेख साथ केली. बचावाच्या आघाडीवर गौरव खत्रीने हाय फाईव्ह करताना आपली छाप पाडली. संकेत चव्हाण आणि अमन यांनी प्रत्येकी चार गुण मिळवून त्यांना सुरेख साथ केली. तमिळ थलैवाजकडून हिमांशू आणि सचिन तंवर या दोघांनाच चमक दाखवता आली. अमिर हुसेन आणि नितेश कुमार यांचा बचावही चांगला राहिला.
सामन्याच्या सुरुवातीपासून वेगवान आणि आक्रमक खेळ करताना पलटण संघाने पूर्वार्धातच दोन लोण चढवत आपली बाजू भक्कम केली. मध्यंतराची २८-१३ गुणांची आघाडी उत्तरार्धात मोठी करत त्यांनी हव्या वाटणाऱ्या विजयाला गवसणी घातली. घरच्या मैदानावर पलटण संघाने मिळविलेला हा दुसराच विजय ठरला. सामना संपल्यावर मैदान सोडताना पुणेरी पलटण संघातील खेळाडूंनी चाहत्यांना हात उंचावून अभिवादन केले आणि अखेरपर्यंत पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले.
दिल्ली संघाची दबंगगिरी पुन्हा सिद्ध
सामन्याच्या ११व्या मिनिटाला चार गुणांनी पिछाडीवर असलेल्या दबंग दिल्लीने गुजरात जाएंट्सला ४५-३१ असे हरविले आणि प्रो कबड्डी लीग मधील प्ले ऑफमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण विजय नोंदविला. मध्यंतराला दिल्ली संघाकडे तीन गुणांची आघाडी होती.