आता पाेलीस स्टेशनमध्ये देखील वाचायला मिळणार पुणेरी पाट्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 04:01 PM2019-07-08T16:01:51+5:302019-07-08T16:04:01+5:30
पुणेकरांना आता पाेलीस स्टेशन आणि पाेलीस चाैक्यांमध्ये देखील पुणेरी पाट्या वाचायला मिळणार आहेत.
पुणे : पुणेरी पाट्या जगभरात प्रसिद्ध आहेत. कमीत कमी शब्दात संदेश समाेरच्यापर्यंत पाेहचविण्याची पुणेकरांची मार्मिक पद्धत या पाट्यांमधून दिसून येत असते. पुणे पाेलिसांकडून पुणेकरांना वाहतूकीचे तसेच इतर कायद्याची माहिती देण्यासाठी एका संस्थेकडून पुणेरी पाट्या तयार करुन घेण्यात आल्या हाेत्या. या पाट्यांचे उद्घाटन पाेलीस आयुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते 15 जून राेजी आयुक्तालयात करण्यात आले हाेते. सुरुवातीला या पाट्या आयुक्तालयात लावण्यात आल्या हाेत्या. आता या पाट्या विविध पाेलीस स्टेशन आणि पाेलिस चाैक्यांमध्ये लावण्यात येत आहेत. त्यामुळे पाेलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या नागरिकांना या पाट्या पाहायला मिळणार आहेत.
पुणेकर हे त्यांच्या मार्मिक टिप्पणीसाठी ओळखले जातात. पुण्यातील पेठांमध्ये आजही पुणेरी पाट्या लावलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे पुणेकरांना वाहतूकीचे नियम तसेच इतर कायद्यांची माहिती देण्यासाठी पुणे पाेलिसांनी याच पाट्यांचा आधार घेतला. एका संस्थेकडून पाेलिसांनी विविध पाट्या तयार करुन घेतल्या. त्यात पुणेकरांची जागृती करण्यात आली हाेती. सुरुवातीला या पाट्या पाेलीस आयुक्तालयामध्ये लावण्यात आल्या हाेत्या. तिथे येणाऱ्या नागरिकांना या पाट्या वाचता येत हाेत्या. आता या पाट्या विविध पाेलीस स्टेशन आणि पाेलीस चाैक्यांच्या बाहेर लावण्यात आल्या आहेत. फरासखाना व विश्रामबाग या पाेलीस स्टेशन्सच्या बाहेर या पाट्या लावण्यात आल्या आहेत. तसेच बालगंधर्व पाेलीस चाैकीच्या बाहेर देखील अशा पाट्या लावण्यात आल्या आहेत. या पाट्या आता नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू हाेत आहेत. बालगंधर्व येथून जाणारे नागरिक आवर्जुन दाेन मिनिटे थांबून या पाट्यांवर काय लिहीले आहे हे पाहत आहेत. पाेलिसांचे कायदे देखील अत्यंत मार्मिक पद्धतीने या पाट्यांमध्ये मांडण्यात आल्या असल्याने नागरिकांचे मनाेरंजन आणि कायद्याबद्दल जागृती देखील हाेत आहे.
काही हटके पुणेरी पाट्या
''खिडकीवरचे पेलमेट आणि डाेक्यावरचे हेलमेट दाेन्हीत आपली सुरक्षितता सामावलेली असते.''
''जीवनावर कंट्राेल नाही, वेगावर नियंत्रण नाही, भरधाव वेगाने जातात म्हणून पाेलिसांनी पकडलं तर म्हणतात आत्ता वेळ नाही''
''आनंदात आणि सुखात बरीच माणसे असतात परंतु तुमच्या दुःखात आणि संकटकाळात फक्त पाेलीस नावाचा माणूस असताे.''