‘स्वच्छता अॅप’मध्ये पुणे विसाव्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 04:08 AM2018-01-03T04:08:18+5:302018-01-03T04:08:25+5:30
केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता अॅप’ला देशातील प्रमुख शहरामध्ये कसा प्रतिसाद मिळाला याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये आयटी शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्याचा क्रमांक खूपच मागे पडला असून, शासनाने जाहीर केल्या आकडेवारीमध्ये पुणे विसाव्या क्रमांकावर गेले आहे.
पुणे - केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता अॅप’ला देशातील प्रमुख शहरामध्ये कसा प्रतिसाद मिळाला याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये आयटी शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्याचा क्रमांक खूपच मागे पडला असून, शासनाने जाहीर केल्या आकडेवारीमध्ये पुणे विसाव्या क्रमांकावर गेले आहे. तर या पाहणीत पिंपरी-चिंचवड सतराव्या क्रमांकावर आहे.
केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरातील स्वच्छ शहर मोहिमेत स्वतंत्र ‘स्वच्छता अॅप’ विकसित केले आहे. या अॅपला नागरिकांचा मिळणार प्रतिसाद, नागरिकांच्या तक्रारींवर महापालिकेने केलेली कार्यवाही, नागरिकांचा सहभाग आणि प्रतिसाद या संदर्भात केंद्र शासनाकडून सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात देशात ग्वाल्हेरने प्रथम क्रमांक पटकवला असून, बृहन्मुंबईने सहावा, तर नागपूरने अठरावा क्रमांक मिळविला आहे. देशभरातील दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पुण्याला मिळालेल्या या स्थानाचा फायदा स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत होणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाºयांनी सांगितले.
शासनाच्या स्वच्छता अॅपवर १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत अॅपचे डाउनलोडिंग, त्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग, नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर महापालिकेने केलेली कार्यवाही, त्याला लोकांचा मिळणारा प्रतिसाद यासंदर्भात आकडेवारीच्या आधारे केंद्र सरकारने पाहणी केली़
या पाहणीत ग्वाल्हेर प्रथम क्रमांकावर असून, कानपूरने द्वितीय, तर विजयवाडा शहराने तृतीय क्रमांक पटकावला आहे. स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक प्रोत्साहित करण्यासाठी ही पाहणी करण्यात आली असून, हे गुण अंतिम क्रमवारीत ग्राह्य धरले जाणार आहे.