पुण्याच्या आकांक्षाला विजेतेपद
By admin | Published: May 7, 2017 03:19 AM2017-05-07T03:19:02+5:302017-05-07T03:19:02+5:30
पुण्याची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आकांक्षा हगवणेने सांगली बुद्धिबळ महोत्सवातील मीनाताई शिरगावकर स्मृती आंतरराष्ट्रीय
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्याची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आकांक्षा हगवणेने सांगली बुद्धिबळ महोत्सवातील मीनाताई शिरगावकर स्मृती आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन खुल्या महिला बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत आकांक्षाने साडेआठ गुणांची कमाई करीत विजेतेपद आपल्या नावे केले. तिला रोख रक्कम ५१ हजार व चंद्राबाई आरवाडे फिरती रौप्यढाल प्रदान करण्यात आली. मुंबईच्या विश्वा शहाला मात्र आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान
मानावे लागले.
आकांक्षा हगवणे व सांगलीची गायत्री रजपूत यांच्यात कौशल्यपूर्ण डाव रंगला. अनुभवी आकांक्षाने ७० व्या चालीला गायत्रीचा पराभव केला. कोल्हापूरची फिडेमास्टर ऋचा पुजारी व औरंगाबादची साक्षी चितलांगे यांच्यातील डाव २२ व्या चालीला बरोबरीत सुटला. आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र शिदोरे, दीपक वायचळ, विनीता श्रोत्री, विवेक सोहनी, विकास भावे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
सांगली बुद्धिबळ महोत्सवातील मीनाताई शिरगावकर फिडे मानांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पुण्याची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर आकांक्षा हगवणे हिला प्रदान करण्यात आले. या वेळी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारविजेत्या माणिक परांजपे, स्मिता शिरगावकर, चित्रा दळवी, संजय केडगे, राजाभाऊ शिरगावकर, चिंतामणी लिमये आदी उपस्थित होते. या वेळी राजाभाऊ शिरगावकर, स्मिता केळकर, कुमार माने आदी उपस्थित होते. नूतन बुद्धिबळ मंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. बापट बाल विद्यामंदिरमध्ये स्पर्धा पार पडल्या.
स्पर्धेचा अंतिम निकाल
आकांक्षा हगवणे : पुणे (प्रथम), विश्वा शहा : मुंबई (द्वितीय), एनएलव्ही अनुषा : आंध्र प्रदेश (तृतीय), साक्षी चितलांगे : औरंगाबाद (चौथी), शालीन पैस : (पाचवी), प्रचिती चंद्रात्रे (सहावी), ऋचा पुजारी : कोल्हापूर (सातवी), गायत्री रजपूत : सांगली (आठवी), नाझिया पटेल : मिरज (नववी), अवरील डेव्हिड (दहावी).