पुणेकरांचा ‘श्वास’ धोक्यात आलाय... !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 09:13 PM2018-07-25T21:13:04+5:302018-07-25T21:29:20+5:30
शहरातील वाढती लोकसंख्या,लोकसंख्येपेक्षा वाढलेली वाहनांची काहीपट संख्या, झपाट्याने वाढणारी सिमेंटची जंगले, मोठ्या उभारण्यात येणारे उद्योगधंदे यांच्यामुळे पुण्याच्या हवेतील प्रदुषणाने धोक्याची पातळी ओलांडली असल्याची धक्कादायक बाब महापालिकेच्या पर्यावरण अहवालामुळे निदर्शनास आली आहे.
पुणे: सध्या माणूस स्वत:च्या आरोग्याच्या बाबतीत प्रचंड मोठ्या प्रमाणात जागरुक झाला आहे. त्यात पुणेकर जरा जास्तच...यात मग महिला आणि पुरुष हे दोघेही आघाडीवर आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मग खाण्यापिण्यापासून ते डाएट, जीम, व्यायाम या सगळ्यावर मोठी गुंतवणुक केली जात आहे. मात्र,संपूर्ण शहरालाच ‘धोक्याची घंटा’ दर्शविणारी माहिती नुकतीच समोर आली आहे. त्यात शहरातील वाढती लोकसंख्या,लोकसंख्येपेक्षा वाढलेली वाहनांची काहीपट संख्या, झपाट्याने वाढणारी सिमेंटची जंगले, मोठ्या उभारण्यात येणारे उद्योगधंदे यांच्यामुळे पुण्याच्या हवेतील प्रदुषणाने धोक्याची पातळी ओलांडली असल्याची धक्कादायक बाब महापालिकेच्या पर्यावरण अहवालामुळे निदर्शनास आली आहे. त्यात पुण्यात ‘हडपसर’ परिसर सर्वांधिक प्रदुषित असल्याचे देखील या अहवालातील आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.
महापालिका प्रशासनाने बुधवार (दि.२६) रोजी ‘पर्यावरण सद्यस्थिती अहवाल’ सर्वसाधारण सभेला सादर केला. मागील २१ वर्षांपासून पुणे महापालिका पर्यावरण सद्यस्थिती अहवाल तयार करत आहे. त्यामध्ये शहरातील हवा,ध्वनी, पाणी प्रदुषण, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण, वृक्षतोड, शहराचा आर्थिक आणि भौगोलिक विकास आणि महापालिकेच्यावतीने करण्यात येणा-या विविध उपाय योजना यांची माहिती देण्यात आली आहे. यंदाच्या पर्यावरण अहवालामध्ये प्रथमच पुणे शहराची वाढ कशी होत गेली हे २००३, २००८, २०१३ आणि २०१८ मधील सॅटेलाईट छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत. यातून मागील पंधरा वर्षात नागरिकीरणामुळे वाढलेल्या बांधकाम क्षेत्राचा कसा टप्प्याटप्प्याने विस्तार झाला व शहरातील हिरवाई कशी कमी होत गेली हे सहज लक्षात येते.
वाढत्या वाहनांमुळे इंधन आणि विजेचा वापर धोकादायक पद्धतीने वाढल्याने हवेतील प्रदूषण वाढले आहे. पर्यावरण प्रयोगशाळेने नोंदविलेल्या आकडेवारीतून शहराच्या मध्यवर्ती मंडई परिसरापेक्षा हडपसर परिसरातील प्रदुषणाची पातळी धोकादायकरित्या वाढत आहे. या परिसरातच मोठ्या प्रमाणावर नव्याने बांधकामे होत असून कचरा प्रक्रिया प्रकल्पांची संख्या अधिक असल्याने धूलीकण, कच-यापासून निर्माण होणा-या विविध गॅसेसमुळे प्रदूषणात धोकादायकरित्या भर पडत आहे.
-----------------
पुणे विद्यापीठ चौकात सर्वांधिक ध्वनी प्रदुषण
दरम्यान महापालिकेकडून प्रयोग शाळमार्फेत शहरातील निवासी, व्यावसायिक आणि शांतता क्षेत्रातील विविध ठिकाणांची ध्वनीची पातळी मोजण्यात येते. त्यात या तिन्ही क्षेत्रांसाठी केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळाने ध्वनीच्या पातळीचे मानकापेक्षा यावषीही पुन्हा जास्तच असल्याचे आढळून आले आहे. प्रामुख्याने शहरातील रहिवाशी क्षेत्रासाठी ध्वनीची पातळी ५५ डेसिबल इतकी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, शहराच्या सर्वच भागात ६५ ते ७५ डेसिबल इतकी ध्वनीची पातळी आहे. त्यात प्रामुख्याने राजाराम पूल व रामवाडी जकात नाका याठिकाणी ध्वनीची पातळी सर्वात जास्त असल्याचे आढळून आले आहे.
व्यावसायिक भागातील ध्वनीची पातळी मानकानुसार ६५ डेसिबल इतकी आहे. मात्र, वडगाव बुद्रुक वगळता शहरातील अन्य सर्व व्यावसायिक भागात ही पातळी ७५ डेसिबलपेक्षा अधिक नोंदवली गेली आहे. तर शहरातील शांतता क्षेत्रातील ध्वनीची पातळी ५० डेसिबल इतकी निश्चित करण्यात आली. त्यात प्रामुख्याने शाळा, रुग्णालये, अशा संस्थाच्या १०० मीटर परिसरासाठी हे शांतता क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. परंतु, पुना हॉस्पीटल वगळता सर्वच शांतता क्षेत्रात ६० ते ६५ डेसिबलपर्यंत नोंदविली गेली आहे, त्यात २०१७ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक परिसरात ध्वनीची पातळी सर्वाधिक आढळून आली आहे.