पुण्यातल्या नगरसेवकांना आमदार व्हायचंय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 05:34 PM2018-05-19T17:34:23+5:302018-05-19T17:59:27+5:30

अनुभव कमी जास्त असला तरी नगरसेवक असणे ही आमदारकीची पहिली पायरी मानली जाते. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन अनेक नगरसेवक आमदारकीची स्वप्ने बघत आहेत.

pune's corporator want to become MLA! | पुण्यातल्या नगरसेवकांना आमदार व्हायचंय !

पुण्यातल्या नगरसेवकांना आमदार व्हायचंय !

Next
ठळक मुद्देपुण्यात आमदाकीसाठी इच्छूकांच्या गुडघ्याला बाशिंगअनेक नगरसेवकांना आमदारकी लढवण्याची इच्छा 

पुणे : मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी एक म्हण आहे. पुण्यातील अनेक नगरसेवकांनाही सध्या मनात असलेली  आमदारकी स्वप्नात दिसायला सुरुवात झाली आहे. वर्षभराने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी पुण्यातील अनेक नगरसेवक तयारीत असून त्यासाठी पक्षश्रेष्टींना गळ घालण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे. 

        सध्या शहराच्या आठही विधानसभा मतदार संघावर भाजपचे वर्चस्व आहे. भाजपला राज्यात सत्तेत येऊन तीन वर्षांपेक्षा अधिक काळ उलटल्याने अनेकांनी आता विधानसभेची तयार सुरु केली आहे. त्याला नगरसेवकही अपवाद नाही. सध्या कसब्यातून आमदार असलेले गिरीश बापट, कोथरूडच्या मेधा कुलकर्णी, पर्वतीच्या माधुरी मिसाळ, हडपसरचे योगेश टिळेकर, शिवाजीनगरचे विजय काळे ही सारी मंडळी आधी नगरसेवक म्हणून काम करत होती. अनुभव कमी जास्त असला तरी नगरसेवक असणे ही आमदारकीची पहिली पायरी मानली जाते. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन अनेक नगरसेवक आमदारकीची स्वप्ने बघत आहेत. यासाठी अनेकांनी तयारी सुरु केली असून फ्लेक्स लावण्यास सुरुवातही केली आहे. अर्थात निवडणुका जाहीर झाल्यावर तिकीट मिळणार की नाही याबद्दल सध्यातरी काहीही खात्री नसली तरी इच्छूकांनी आत्त्ताच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. 

            आमदारकीसाठी भाजपमध्ये इच्छूकांची संख्या सर्वाधिक असून त्या खालोखाल गत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा नंबर लागतो. भाजपमध्ये प्रत्येक मतदार संघात इच्छूक असले तरी सीटिंग मेंबर असलेल्यांना डावलून तिकीट मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे पर्वती, हडपसर यांच्यासह काही निवडक ठिकाणी तरी सीटिंग आमदारांना पसंती मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडेही अनेक जुने नगरसेवक इच्छूक असून त्यासाठी ताकद लावण्याची अनेकांची तयारी आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छूकांची रांग असून हडपसरसाठी महापालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे, खडकवासल्यासाठी सचिन दोडके, कोथरुडसाठी दीपक मानकर अशी काही नावे चर्चेत आहेत. शिवसेनेतही माजी आमदार चंद्रकांत मोकाटे तयारीत असल्याचे समजते. याशिवायही अनेक जण आपल्या इच्छा बोलून दाखवत आहेत. त्यामुळे निवडणुकीची काहीही निश्चिती नसली तरी तयारीला सुरुवात झाल्याचे मानायला हरकत नाही. 

Web Title: pune's corporator want to become MLA!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.