आजपासून पुण्याची पुन्हा कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:10 AM2021-04-03T04:10:11+5:302021-04-03T04:10:11+5:30

-रेस्टॉरंट, मॉल, धार्मिक स्थळे, चित्रपट गृह, पीएमपीएलला कुलूप लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची ...

Pune's dilemma again from today | आजपासून पुण्याची पुन्हा कोंडी

आजपासून पुण्याची पुन्हा कोंडी

Next

-रेस्टॉरंट, मॉल, धार्मिक स्थळे, चित्रपट गृह, पीएमपीएलला कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या आठ-दहा दिवसांत वाढली असून परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात तातडीने किमान पंधरा दिवसांची तरी टाळेबंदी करावी, असा प्रशासनाचा आग्रह होता. मात्र सर्वच लोकप्रतिनिधींनी त्यास विरोध केल्याने वेगळ्या प्रकारची टाळेबंदी पुणेकरांवर लादण्यात आली आहे. शनिवार (दि.३) पासून पुढचे सात दिवस पुणे जिल्ह्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच कालावधीत दिवसा जमावबंदी लागू असेल. तसेच जिल्ह्यातील सर्व हाॅटेल, रेस्टॉरंट, बार, माॅल, धार्मिक स्थळे, चित्रपटगृहासह पीएमपीएल बस सेवा पूर्ण बंद राहणार आहे.

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी (दि.२) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तत्पूर्वी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, अमोल कोल्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, आमदार भीमराव तापकीर, राहुल कुल, सुनील टिंगरे, संजय जगताप, अतुल बेनके यांच्यासह जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे आदी प्रमुख बैठकीला उपस्थित होते.

राव यांनी सांगितले की पुण्याचा ‘पाॅझिटिव्हिटी रेट’ (दर शंभर चाचण्यांमागे आढळणारे कोरोना रुग्ण) आठ दिवसांपूर्वी २७-२८ टक्के होता. हा दर आता ३२ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. सध्याचा रुग्णवाढीचा वेग लक्षात घेतला तर यात आणखी वाढ होईल व रुग्णांना खाटा उपलब्ध करून देणे कठीण होईल. यामुळेच कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सात दिवस हे निर्बंध असून येत्या शुक्रवारी (दि.९) याचा पुन्हा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.

चौकट

पुणे जिल्ह्यात येत्या सात दिवसांसाठी

-पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील सर्व हाॅटेल, रेस्टॉरंट, बार, ढाबे मॉल, शाॅपिंग सेंटर, चित्रपट गृहे, नाट्यगृहे बंद.

- पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील पीएमपीएल बस सेवा बंद.

- एस. टी. बस सेवा सुरू राहणार.

- अत्यावश्यक सर्व सेवा संचारबंदीतून वगळण्यात आल्या.

- शहर, जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार, शेतकरी बाजार बंद.

- शहरातील महापालिकेच्या भाजी मंडई सुरू राहतील.

- शाळा आणि महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंदच. मात्र, परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील.

- खासगी, सरकारी कार्यालये, औद्योगिक आस्थापना, कंपन्या सुरू राहणार.

- उद्योग किंवा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी बसची स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार.

- संचारबंदीच्या काळात खासगी कार्यालयांमधून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित कंपन्यांनी त्याबाबतचे पत्र किंवा ओळखपत्र दाखवल्यानंतर कारवाई होणार नाही.

- लग्न समारंभाला ५० लोकांच्या तर अंत्यविधीला २० लोकांच्या उपस्थितीचा नियम कडक करणार.

- उद्याने सकाळच्या वेळेत सुरू राहतील.

- राजकीय, सांस्कृतिक, सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांना पूर्ण बंदी.

Web Title: Pune's dilemma again from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.