कबड्डीतील पुण्याच्या सुवर्णकन्येची रॅली काढून सन्मान; भारतासाठी मिळविले सुवर्णपदक
By श्रीकिशन काळे | Published: October 12, 2023 05:48 PM2023-10-12T17:48:46+5:302023-10-12T17:57:07+5:30
शहरात अनेक ठिकाणी स्वागत झाल्यावर ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी गेली
पुणे: चीनमध्ये झालेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय महिला कबड्डी संघाने सुवर्णपदक जिंकून भारताचा अभिमान उंचावला आहे. या संघामध्ये पुण्याची स्नेहल शिंदे ही कबड्डीपटू सहभागी असून, तिने अधिक प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू बाद केले. या सुवर्णकन्येचे गुरूवारी सकाळी सन्मानार्थ रॅली काढण्यात आली. आमदार रवींद्र धंगेकर यांनी तिचा सत्कार केला.
भारतीय कबड्डीपटू संघामध्ये महाराष्ट्रातून स्नेहल ही एकमेव खेळाडू आहे. तिने संघाच्या वतीने अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यामुळे भारतीय संघाला सुवर्णपदक पटकाविता आले. आज तिच्या सन्मानासाठी ओपन जीपमधून खास रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी तिचे जल्लोषात स्वागत झाले. त्यानंतर ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी गेली. तिथे तिने आरती केली. खडक पोलीस लाइनमध्ये तिचे कुटुंबीय राहते. पोलीस कर्मचारी प्रदीप शिंदे यांची ती मुलगी आहे. त्यामुळे खडक पोलीस लाइनच्या वतीने खास स्नेहलचे स्वागत झाले. स्नेहल हिला यापूर्वीच महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे. तसेच तिने भारतीय संघाचे चार वेळा प्रतिनिधीत्व केले असून, ४ वेळा भारतासाठी सुवर्णपदक पटकाविले आहे. तसेच तिने १४ वेळा महाराष्ट्र कबड्डी संघाचे प्रतिनिधीत्व देखील केलेले आहे. त्यामुळे तिचा आज अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये सत्कार करण्यात आला.