पुण्याचं हेरिटेज कचऱ्याच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 07:42 PM2018-04-18T19:42:47+5:302018-04-18T19:45:57+5:30
जागतिक वारसा दिनानिमित्त शनिवारवाड्याच्या परिसराचा अाढावा घेतला असता, शनिवारवाड्याच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे चित्र अाहे.
पुणे : जगभरात कुठेही पुणे शहराचं नाव घेतलं की डाेळ्यासमाेर येताे ताे पुण्यातील शनिवारवाडा. पुण्याच्या इतिहासात शनिवारवाड्याला अनन्य साधारण महत्त्व अाहे. परंतु पुण्याचं हे वैभव अाज कचऱ्याच्या विळख्यात अससल्याचे पाहायला मिळतंय. शनिवारवाड्याच्या बाहेरील बाजूस कचऱ्याचं सम्राज्य पसरलं असून प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे पुण्याचं हे वैभव कचऱ्याच्या विळख्यातून बाहेर काढून त्याचं पूर्वीच पावित्र्य जपलं जाणार का असा प्रश्न अाता उपस्थित केला जात अाहे.
18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन अर्थात हेरिटेज डे म्हणून जगभर साजरा केला जाताे. याच हेरिटेज डे च्या निमित्ताने लाेकमतने पुण्याचे हेरिटेज असलेल्या शनिवारवाड्याचा अाढावा घेतला असता, हा शनिवारवाडा कचऱ्याच्या विळख्यात असल्याचे समाेर अाले. शनिवारवाड्याच्या सर्वच बाजूंना कचऱ्याचे साम्राज्य पसरले अाहे. देश-विदेशातून पर्यटक शनिवारवाडा पाहण्यासाठी येत असतात. शनिवारवाड्याला एेतिहासिक वास्तूचा दर्जाही देण्यात अाला अाहे. या वाड्याच्या बाजूचा फूटपाथ हा पथारी व्यावसायिकांनी व्यापल्याचे चित्र अाहे. काहींनी तर वस्तू टांगूण ठेवण्यासाठी वाड्याच्या बुरुजाला खिळे मारले अाहेत. तसेच वाड्याच्या सभाेवताली अनेक भिकारी व मनाेरुग्ण बसलेले असतात. त्यांच्याकडून माेठ्याप्रमाणावर अस्वच्छता या भागात केली जात अाहे. शनिवारवाड्याच्या संपूर्ण परिघात ठिकठिकाणी कचरा साठलेला दिसून येताे. या कचऱ्यात गुटख्याची पाकिटे, चहाचे प्लॅस्टिकचे कप, शिळं अन्न, राडाराेडा पाहायला मिळताेय. येथील झाडांचा पालाही अनेक दिवसांपासून उचलण्यात अालेला नाही. या भागात असलेले मनाेरुग्ण त्याच ठिकाणी मलमूत्र विसर्जीत करत असल्याने शनिवारवाड्याच्या रस्त्याच्या बाजूने चालताना रुमाल नाकाला लावावा लगत असल्याची परिस्थिती निर्माण झाली अाहे.
शनिवारवाड्याच्या काही बुरुजांवर प्रेमी युगलांनी लेखन केले अाहे. काहीजन या बुरुजांना टेकूनच झाेपत असल्याने शनिवारवाड्याला वेगळेच स्वरुप प्राप्त झाले अाहे. पानमसाला, गुटखा खाऊन काेपऱ्यांमध्ये थुंकण्यात अालेले अाहे. काही समाजकंटक शनिवारवाड्याच्या बाहेरील बाजूच्या कुंपनाजवळच लघुशंका करीत असल्याने शनिवारवाड्याच्या एेतिहासिक महत्त्वालाच हरताळ फासला जात अाहे. त्यामुळे या सर्वांवर कारवाई हाेणार का असा प्रश्न अाता नागरिक विचारत अाहेत.