पुण्याची ओळख आता ‘खासगी सहभागा’च्या हवाली; सारसबाग, तुळशीबाग, मंडईचा होणार कायापालट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 08:00 PM2021-03-01T20:00:51+5:302021-03-01T20:01:11+5:30
पुण्याची ओळख असलेली ठिकाणी आता खासगी विकसकांच्या हवाली केली जाणार
पुणे : पुण्याची ओळख असलेल्या सारसबाग, तुळशीबाग, महात्मा फुले मंडई, नेहरु स्टेडीयमचा आता खासगी सहभागातून (पीपीपी मॉडेल) पुनर्विकास केला जाणार आहे. यामधून पालिकेला उत्पन्न मिळणार आहे. यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आली आहे. पुण्याची ओळख असलेली ही ठिकाणी आता खासगी विकसकांच्या हवाली केली जाणार असल्याने या स्थळांचे जतन होणार की खासगीकरण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- महात्मा फुले मंडई-
ब्रिटीश काळात उभारण्यात आलेल्या ग्रे मार्केट अर्थात प्रचलित महात्मा फुले मंडईचा काही वर्षांपुर्वी पुनर्विकास करण्यात आला होता. त्यातील काही भाग मेट्रोच्या भुयारी मार्ग, मेट्रो स्थानक आदी कामामध्ये बाधित होणार आहे. आता नव्याने पीपीपी मॉडेलद्वारे पुनर्विकास करण्याचा घाट घालण्यात आला आहे. याभागातील वर्दळ वाढणार असल्याने भाजी मंडईची क्षमता वाढविणे, गाळे वाढविणे, विस्तारीत पार्किंग सुविधा निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- तुळशीबाग-
महिला आणि तरुणींचे आकर्षण असलेल्या तुळशीबागेचे ऐतिहासिक महत्वही आहे. याठिकाणी श्रीराम, गणपती, महादेव, हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी आणि दत्तात्रेयांची पेशवेकालीन मंदिरे आहेत. पाककलेशी संबंधित साहित्य, कॉस्मॅटिक, ज्वेलरी आणि नित्य गृहोपयोगी वस्तू मिळण्याचे हक्काचे ठिकाण अशी तुळशीबागेची ओळख आहे. हे ठिकाण ऐतिहासिक, धार्मिक आणि व्यावसायिकदृष्टया महत्वाचे आहे. भविष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन पीपीपी तत्त्वावर विकसन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
- सारसबाग आणि पं. नेहरू स्टेडियम परिसराचा एकत्रित पुनर्विकास-
पालिकेच्या सारसबाग आणि पेशवे पार्क या मिळकतींचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर पुनर्विकास करण्याचे गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात प्रस्तावित करण्यात आले होते. या मिळकतींसह स्वारगेट येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, बालभवन, गणेश कला क्रीडा संकुल आणि परिसर (प्लॉट 41, 42 आणि 43 ए) या मिळकतींचा पीपीपी तत्त्वावर पुनर्विकास करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.
- मुद्रणमहर्षी मामाराव दाते मुद्रणालय -
घोले रस्त्यावरील पालिकेच्या मुद्रणमहर्षी मामाराव दाते मुद्रणालयाच्या मिळकतीचे बाजारमूल्य मोठे आहे. मुद्रणालय आणि आरोग्य कोठी या दोन्ही मिळकतींचाही पीपीपी तत्वावर पुनर्विकास केला जाणार आहे. येथून जवळच महापौर निवास, राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, घोले रोड क्षेत्रीय कार्यालय या वास्तू आहेत. या विकसनामधून उत्पन्न मिळविण्यात येणार आहे.
- जांभुळवाडी तलावाचा पीपीपी तत्त्वावर पुनर्विकास -
पालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या जांभुळवाडी परिसरात असलेल्या तलावाला पर्यावरणीय महत्व आहे. या तलावाच्या भोवती मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत. सुमारे 70 एकर क्षेत्रफळाच्या सभोवती 100 मीटर परिसरात ‘नो कन्स्ट्रक्शन झोन’ आहे. परिसराचे पर्यावरणाचे जतन करणे, पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जैवउद्यान, जॉगिंग ट्रॅक, योग केंद्र, बालक्रीडांगण, नौकानयन, मत्स्यव्यवसाय आदी सुविधा विकसित करण्यात येणार असल्याचे रासने यांनी सांगितले.