पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ! मराठमोळ्या जितेंद्र गवारेचे 'एव्हरेस्ट'वर पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 04:35 PM2021-05-12T16:35:19+5:302021-05-12T16:40:28+5:30
पुण्यातील गिर्यारोहक जितेंद्र गवारे यांनी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर चढाई करण्याची कामगिरी केली आहे...
पिंपरी : पुण्यातील गिर्यारोहक जितेंद्र गवारे यांनी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर चढाई करण्याची कामगिरी केली आहे. अवघ्या पंचवीस दिवसांपूर्वी जगातील दहावे उंच शिखर असलेले अन्नपूर्णा मोहीम पूर्ण केल्यानंतर लगेचच सर्वोच्च शिखर सर करण्याची कामगिरी गवारे यांनी केली आहे.
पुण्यातील वडगाव शेरी येथे राहणाऱ्या गवारे (वय ४२) यांनी बुधवारी (दि १२) सकाळी साडेसातच्या सुमारास एव्हरेस्टवर पाऊल एक नवा इतिहास रचला. गिरिप्रेमीचे सदस्य असलेल्या गवारे यांनी १६ एप्रिल रोजी माउंट अन्नपूर्णा-१ शिखर (८०९१ मीटर) सर केले होते. अवघ्या पंचवीस दिवसांच्या अंतराने दोन आठ हजार मीटरहून अधिक उंचीचे शिखर सर करण्याची कामगिरी केली. या पूर्वी मुंबईच्या केवल कक्का याने एकाच महिन्यात दोन अष्टहजारी शिखरांवर चढाई केली होती.
गवारे यांनी लेह मधील जिग्मेट आणि शेर्पासह ही मोहीम पूर्ण केली. पुण्याहून एव्हरेस्टवीर गणेश मोरे, गिर्यारोहक विवेक शिवदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रा. डॉ. अविनाश कांदेकर यांनी जितेंद्रला हवामानाचा अचूक अंदाज सांगितला. त्यामुळेच जितेंद्र आणि त्यांचा शेर्पा याना ८८४८.८६ मीटर उंचीच्या एव्हरेस्टवर चढाई करणे शक्य झाले.
ज्येष्ठ गिर्यारोहक आणि अष्टहजारी मोहिमेचे नेते उमेश झिरपे, एव्हरेस्टवीर भूषण हर्षे, तीन अष्ट हजारी मोहिमा पूर्ण करणारे डॉ. सुमित मांदळे यांनी गवारे यांना मार्गदर्शन केले.
-----
गवारे यांची या पूर्वीची कामगिरी
गवारे यांनी यापूर्वी २०१९ साली जगातील तिसऱ्या उंचीच्या कांचनजुंगा पर्वतावर तिरंगा फडकवला होता. त्याच वर्षी हिमालयातील माउंट अमा डबलाम (६८१२ मीटर) ही खडतर मोहिमही त्यांनी पूर्ण केली आहे. हे शिखर एव्हरेस्ट पेक्षा कमी उंचीचे असले तरी गिर्यारोहकांना चढाईसाठी एव्हरेस्ट पेक्षा खडतर वाटते.