पुणेकरांचा प्रवास हाेणार प्रदूषणमुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 11:52 AM2019-02-09T11:52:32+5:302019-02-09T12:04:24+5:30
पुणेकरांचा प्रवास आता प्रदूषणमुक्त हाेणार आहे. पीएमपीकडून 25 इलेक्ट्रीक बसेसची खरेदी करण्यात आली असून नुकताच त्यांची चाचणी घेण्यात आली हाेती.
पुणे : पुणेकरांचा प्रवास आता प्रदुषणमुक्त हाेणार आहे. पीएमपीकडून 25 इलेक्ट्रीक बसेसची खरेदी करण्यात आली असून नुकताच त्यांची चाचणी घेण्यात आली हाेती. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बसेसचा लाेकार्पण साेहळा पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात या 25 बसेस पुण्यातील 3 मार्गांवर आणि पिंपरी चिंचवडच्या चार मार्गांवर धावणार आहेत. या बसेसमुळे प्रदुषण कमी हाेऊन पुणेकरांचा प्रवास प्रदूषणमुक्त हाेणार आहे.
पीएमपीने 25 इलेक्ट्राॅनिक बसेस खरेदी केल्या आहेत. या बसेसची चाचणी काही महिन्यांपूर्वी घेण्यात आली हाेती. या चाचणीत या बसेस पास झाल्याने आता या बसेस नागरिकांच्या सेवेत दाखल हाेणार आहेत. आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बसेसचा लाेकार्पण साेहळा पार पडणार आहे. या बसेस संपूर्ण इलेक्ट्राॅनिक असून यामुळे प्रदूषण राेखले जाणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात पाचशे ई-बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. यापैकी पहिल्या टप्यात शहरात 25 बसेस धावणार आहेत. नव्याने येणाऱ्या ई-बसेस दोन्ही महापालिका हद्दीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांना ई-बसेसमधून प्रवास करता यावा, असे मार्ग ई-बसेससाठी निश्चित करण्यात आले असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
या ई- बसेस चार्ज करण्यासाठी भेकराईनगर आणि निगडी डेपाे येथे चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी या बसेस चार्ज करण्यात येणार आहेत. एकदा चार्ज केल्यानंतर किती किलाेमीटर या बस धावतील याची माहिती मात्र मिळू शकली नाही.
या मार्गावर धावणार ई-बस
पुणे शहर
- भेकराईनगर ते पिंपळेगुरव (6 बसेस)
- न.ता.वाडी ते भेकराईनगर (3 बसेस)
- भेकराईनगर ते पुणे स्टेशन (3 बसेस)
- हडपसर ते हिंजवडी (3 बसेस)
पिंपरी- चिंचवड
- डांगे चौक ते हिंजवडी चौक (6 बसेस)
- मनपा भवन ते आकुर्डी रेल्वे स्टेशन (2 बसेस)
- भोसरी ते निगडी (2 बसेस)