Pune | पुण्याचे किमान तापमान ११.२ अंशांवर; राज्यात किमान तापमानात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 09:12 AM2022-11-23T09:12:37+5:302022-11-23T09:14:08+5:30
ळगाव येथे पारा १० अशांच्या खाली अर्थात ९.२ अंश इतका घसरला..
पुणे : मागील दोन दिवस थंडीचा अनुभव घेतल्यानंतर मंगळवारी (दि. २२) राज्यात किमान तापमानात वाढ झाली. पुण्यातील तापमानात तीन अंशानी वाढ होऊन पारा ११.२ अंशांवर स्थिरावला. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. जळगाव येथे पारा १० अशांच्या खाली अर्थात ९.२ अंश इतका घसरला. पुढील तीन दिवस थंडी कमी होईल असा अंदाज आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात जळगाव, पुणे, नाशिक व औरंगाबाद या शहरांमध्ये पारा दहा अंशांच्या खाली घसरला. त्यामुळे राज्यात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. सोमवारी जळगावात राज्यातील नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले होते. पुण्यातही पारा ८.८ अंशांवर घसरला होता. मंगळवारी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश शहरांमध्ये किमान तापमानात वाढ झाली. मंगळवारी जळगावचे तापमान ९.२, नाशिक ९.५, तर औरंगाबाद येथे १० अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुण्यात किमान तापमान ११.२ अंश सेल्सिअस होते. पुढील तीन दिवस किमान तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमधील किमान तापमान :
पुणे ११.२, जळगाव ९.२, कोल्हापूर १९.१, महाबळेश्वर १२.१, नाशिक ९.५, सांगली १८.१, सातारा १५.५, सोलापूर १८.८, मुंबई २१.४, रत्नागिरी १९.१, डहाणू १६.५, उस्मानाबाद ९.९, औरंगाबाद १०, परभणी १४.२, नांदेड १६, अकोला १३.१, अमरावती ११.७, बुलढाणा १२.५, ब्रह्मपुरी १४.१, चंद्रपूर १४.८, गोंदिया ११.२, नागपूर १३, वाशिम १३, वर्धा १२.४.