कोरोनाविरोधातल्या ‘हर्ड इम्युनिटी’कडे पुण्याची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:12 AM2021-07-14T04:12:32+5:302021-07-14T04:12:32+5:30

लोकमत नेटवर्क पुणे : पुण्यासह संपूर्ण जगात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना संसर्गजन्य आजारावर पुणे शहराने आत्तापर्यंत यशस्वीरित्या लढा दिला आहे. ...

Pune's move towards 'Heard Immunity' against Corona | कोरोनाविरोधातल्या ‘हर्ड इम्युनिटी’कडे पुण्याची वाटचाल

कोरोनाविरोधातल्या ‘हर्ड इम्युनिटी’कडे पुण्याची वाटचाल

Next

लोकमत नेटवर्क

पुणे : पुण्यासह संपूर्ण जगात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना संसर्गजन्य आजारावर पुणे शहराने आत्तापर्यंत यशस्वीरित्या लढा दिला आहे. विशेष म्हणजे एकूण लोकसंख्येच्या ३६ टक्के लसीकरण व साधारणत: पाच लाख नागरिकांनी कोरोनावर केलेली मात यामुळे आजमितीला शहर कोरोनाविरोधातील सामुहिक प्रतिकार शक्ती तयार होण्याकडे वाटचाल करीत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे़

शहरातील एकूण लोकसंख्येच्या ५० ते ६० टक्के लोकसंख्येमध्ये एखाद्या संसर्गजन्य आजाराविरोधात प्रतिपिंडे (अ‍ॅण्टीबॉडीज्) तयार झाल्यावर, वैद्यकीय क्षेत्रात त्या आजाराविरोधातील ‘हर्ड इम्युनिटी’ (सामुहिक प्रतिकार शक्ती) तयार झाल्याचे सांगितले जाते. त्यानुसार कोरोनाविरूध्दच्या या सामुहिक प्रतिकार शक्तीकडे सध्या पुणे शहर वाटचाल करीत असल्याचे दिलासादायक चित्र शहरातील एकूण लसीकरण व शहरातील कोरोना रूग्णवाढीच्या व बरे होण्याच्या प्रमाणातून दिसून येत आहे.

“मात्र अद्यापही आपण पूर्णपणे शहरात सामुहिक प्रतिकार शक्ती तयार झाल्याचा दावा करीत नसून, त्या शक्तीच्या उंबरठ्यावर तर नक्की आहोत,” असे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले़

महापालिका हद्दीत एकूण ४२ लाख लोकसंख्येला कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. यापैकी १५ लाख ४६ हजार जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून ४ लाख ९१ हजार १८२ जणांचे लसीचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. शहरात आजपर्यंत ५ लाखापर्यंत नागरिकांना कोरोनाची बाधा होऊन गेली आहे. यापैकी ९८ टक्के नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांच्यामध्ये उपचाराअंती अथवा शरीरातील अंतर्गत प्रतिकार शक्तीमुळे अ‍ॅण्टीबॉडीज् तयार झाल्या आहेत. शहरात असे अनेकजण असे आहेत की, कोरोनाचा संसर्ग होऊन गेला तरी कळून आले नाही अशांची नेमकी आकडेवारी नाही. तरी शहरातील दाट लोकवस्तीत अथवा झोपडपट्टी भागात अशा लोकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.

या सर्वांचा एकत्रित विचार करता शहरात सध्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांमध्ये कोरोनाविरोधात लढा देणाऱ्या अ‍ॅण्टीबॉडीज् तयार झाल्या आहेत. दरम्यान शहरातील लसीकरणाचा वेग असाच कायम राहिल्यास आपण लवकरात लवकर कोरोना संसर्गजन्य आजाराविरोधात सामुहिक प्रतिकार शक्ती प्राप्त केल्याचे म्हणू शकतो. परंतू कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी खबरदारी जरूरी असून मास्कचा वापर, गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, योग्य वेळी उपचार अत्यावश्यक असल्याचे डॉ़ वावरे म्हणाले.

Web Title: Pune's move towards 'Heard Immunity' against Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.