पुण्याच्या नीरज आनंद याचा खळबळजनक निकाल;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:14 AM2021-02-17T04:14:28+5:302021-02-17T04:14:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सोलारीस क्लबतर्फे आयोजित तिसऱ्या ‘सोलारीस करंडक’ वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या ३५ वर्षांखालील गटात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सोलारीस क्लबतर्फे आयोजित तिसऱ्या ‘सोलारीस करंडक’ वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या ३५ वर्षांखालील गटात पुण्याच्या नीरज आनंदने अग्रमानांकित रवींद्र पांड्ये याचा पराभव करून खळबळजनक निकाल नोंदविला. धवल पटेल, राजेश दवे, राहुल शर्मा या खेळाडूंनी आपापल्या गटात प्रतिस्पर्धी खेळाडूंवर संघर्षपूर्ण विजय नोंदवित आगेकूच केली.
सोलारीस क्लब आणि डेक्कन जिमखाना क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत ३५ वर्षांवरील गटाच्या पहिल्या फेरीतच सनसनाटी निकाल नोंद झाली. नीरज आनंद याने पुण्याच्याच आणि गतविजेत्या रवींद्र पांड्ये याचा ६-४, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. सव्वा तास चाललेल्या सामन्यात आनंदने पांड्ये या अग्रमानांकित खेळाडूंपेक्षा वरचढ खेळ केला. बेसलाइनवरून खेळताना आनंदने ताकदवान क्रॉस शॉटस्चे अचूक प्रदर्शन केले. त्याच्या या वेगवान खेळापुढे पांड्येचा निभाव लागला नाही.
३५ वर्षांखालील गटात नवेंद्रसिंग चौहान याने नीतेश रूंगठा याचा ६-१, ६-० असा तर ज्ञानेश्वर पाडाळे याने रोहित माने याचा ६-१, ६-२ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. ४५ वर्षांवरील गटामध्ये राष्ट्रीय खेळाडू व गतविजेता नितीन कीर्तने याने राहुल सिंगचा ६-०, ६-० असा सहज पराभव केला. अतितटीच्या सामन्यात राजशे दवे याने रामचंद्र व्ही. याचा टायब्रेकरमध्ये ७-६(५), ६-३ असा पराभव केला. राजेश डिसुझा, राहुल शर्मा, सुनील लुल्ला, नीलेश शहा, दिनेश कुमार, संजय डाब्रा आणि केतन बेडेकर यांनी विजय मिळवत दुसरी फेरी गाठली.
७० वर्षांखालील गटात धवल पटेल याने हेमंत साठे याचा ३-६, ७-५, ७-६(५) असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. अजित पेंढारकर, धवल पटेल, श्रीकांत पारेख, गंगाधरन एस., ताहीर अली, रूमी प्रिंटर आणि पद्माली यांनीही प्रतिस्पर्धी खेळाडूवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.