Corona Vaccination: पुण्याचं 'एक कोटी' लसीकरण पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 09:39 PM2021-09-23T21:39:01+5:302021-09-23T21:39:01+5:30
जिल्हा लसीकरणात अव्वल स्थानावर राहिला असून आजपर्यंत एक कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला आहे.
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं राज्यासहित पुण्यातही हाहाकार माजवला होता. या लाटेत अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. त्यावेळी आरोग्य यंत्रणाही हतबल होण्याच्या मार्गावर होती. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करून दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी धडपड करत होते. दोन महिन्यांनी दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली. त्याच पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच त्यांनी लसीकरणावरही भर दिला आहे.
पुणे जिल्ह्यातही रुग्णसंख्येनं उच्चांक गाठला होता. त्याच वेळी खबरदारी घेऊन लसीकरणाचा वेग वाढवला. त्यानंतर जिल्हा लसीकरणात अव्वल स्थानावर राहिला असून आजपर्यंत एक कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. ७० लाख नागरिकांनी पहिला तर ३० लाख नागरिकानी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाचा हाच वेग राहिला तर लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचं लसीकरण होईल. लसींचा मुबलक पुरवठा सामाजिक संस्था, कंपन्यांकडून संयुक्तपणे राबविण्यात येणारी लसीकरण शिबिरे यामुळं पुण्यानं लसीकरणाचा उच्चांक गाठला आहे. मागील १५ दिवसांत जिल्ह्यात ११ लाख जणांचं लसीकरण झालं होतं.
जानेवारी मध्ये लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्यात डॉक्टर आणि नर्स यांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स आणि टप्याटप्याने ६० वर्षांपुढील, ४५ वर्षांपुढील तर आता १८ वर्षांपुढील अशा सर्वांचे लसीकरण सुरू आहे. जानेवारी ते मार्च या महिन्यांत ८ लाख ८४ हजार लभार्थ्यांचे लसीकरण झाले. मे महिन्यात ५ लाख ४३ हजार लसीकरण झाले. लाभार्थ्यांची वाढती संख्या आणि लसीचा अपुरा पुरवठा यामुळे लसीकरण कमी होत होते. मात्र, जूननंतर लसीकरणाचा वेग वाढल्यामुळे मागील साडेतीन महिन्यांत तब्बल ६३ लाख लाभर्थींचे लसीकरण झाले. म्हणजे एकूण लसीकरणामधील ७० टक्के लसीकरण या साडेतीन महिन्यांत झाले.
१५ दिवसांत ५ वेळा तब्बल १ लाखांपेक्षा अधिक लसीकरण
सप्टेंबरमध्ये लसीचा मोठ्या प्रमाणात आलेला साठा आणि विविध कंपन्यांकडून राबविण्यात आलेल्या लसीकरणामुळे मागील पंधरा दिवसांत तब्बल 5 वेळा जिल्ह्यात एक लाखांपेक्षा अधिक लसीकरण झाले. तर, एका दिवशी तब्बल पावणेतीन लाख लसीकरणाचा टप्पा पार करत उच्चांक गाठलेला आहे.