पुण्याचा आराखडा राज्यातील उच्चांकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:12 AM2021-02-13T04:12:37+5:302021-02-13T04:12:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यात तब्बल २५ टक्क्यांनी वाढ करत राज्यातील उच्चांकी ६८० कोटी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यात तब्बल २५ टक्क्यांनी वाढ करत राज्यातील उच्चांकी ६८० कोटी रुपयांच्या आरखड्यास राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली. हा आराखडा मंजूर करताना ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यावर अधिक भर द्या, अशी सूचना पवार यांनी केली.
पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.१२) पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांची सन २०२१-२२ चा सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी बैठक घेण्यात आली. पुण्यातील विधानभवन सभागृहात झालेल्या बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार मुक्ता टिळक, सुनील शेळके, सुनील टिंगरे, दिलीप मोहिते, अतुल बेनके, अशोक पवार, अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, उपायुक्त (नियोजन) राजेश तितर, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळ आदी यावेळी उपस्थित होते.
शासनाने जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण प्रारूप आराखड्यासाठी ५२०.७८ कोटी रुपयांची मर्यादा ठरवून दिली होती. यात वाढ होवून ६८० कोटी रुपयांचा जिल्हा वार्षिक योजनेचा सर्वसाधारण प्रारुप आरखडा मंजूर करण्यात आला. पवार म्हणाले, “जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करून उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येक महसूल विभागातील उत्कृष्ट जिल्ह्याला ५० कोटींचा अतिरिक्त निधी देण्यात येईल.”
चौकट
जिल्हानिहाय मंजूर झालेला जिल्हा वार्षिक आराखडा (आकडे कोटी रुपये)
पुणे : ६८०
कोल्हापूर : ३७५
सोलापूर : ४७०
सांगली : ३८०
सातारा : ३२०