सत्तेने भाजपाला आलेली सूज उतरवणारा पुण्याचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:15 AM2020-12-05T04:15:24+5:302020-12-05T04:15:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यात सत्ता हाती असताना चोहोबाजूने येणारा नेते-कार्यकर्त्यांचा ओघ सत्ता गेल्यानंतर त्याच वेगाने ओसरु लागला. काही ...

Pune's result that brought down the swelling that came to BJP from power | सत्तेने भाजपाला आलेली सूज उतरवणारा पुण्याचा निकाल

सत्तेने भाजपाला आलेली सूज उतरवणारा पुण्याचा निकाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यात सत्ता हाती असताना चोहोबाजूने येणारा नेते-कार्यकर्त्यांचा ओघ सत्ता गेल्यानंतर त्याच वेगाने ओसरु लागला. काही ठिकाणी नेते राहिले पण कार्यकर्ते गायब झाले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढत असल्याचे वरपांगी चित्र म्हणजे केवळ सत्तेमुळे आलेली सूज होती. प्रत्यक्षात पश्चिम महाराष्ट्रात पक्ष रुजवण्यासाठी आणखी बराच लांबचा पल्ला गाठायचा असल्याचा साक्षात्कार पदवीधरच्या निवडणुकीच्या निकालाने भारतीय जनता पक्षाला घडवला.

‘पन्नाप्रमुख’, ‘प्रचार यंत्रणा’ वगैरेचा उभा केला जाणारा डोलारा प्रत्यक्षात पोकळ का असतो? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने झोकून उतरल्याखेरीज भाजपाला पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे का जाता येत नाही? संघाच्या मदतीशिवाय निवडणूक जिंकून देणारे कार्यकर्ते कुठून गोळा करायचे? याचेही उत्तर भाजपाला मिळवावे लागेल. केवळ आयात नेते-कार्यकर्ते आणि पक्षश्रेष्ठींकडून लादले जाणारे नेते यांच्या बळावर पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढवता येईल का याचाही विचार भाजपाला करावा लागेल.

सन २०१४ मध्ये आधी केंद्रात आणि राज्यात अशा दोन्ही ठिकाणी प्रथमच भारतीय जनता पक्ष सत्ताधारी झाला. पाठोपाठ २०१९ मध्येही भाजपाने देशाची सत्ता स्वबळावर मिळवली. यामुळे ‘इनकमिंग’चा प्रचंड ओढा भाजपाच्या दिशेने सर्व पक्षातून आणि राज्यभरातून वाहू लागला. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात जिथे भाजपा नावालाही नव्हता त्या भागात गेल्या सहा वर्षांमध्ये अनेक मातब्बर राजकीय घराणी आणि पुढारी भाजपाने पक्षात घेतले. यामुळे भाजपाचा प्रचंड विस्तार झाला. पण हा भास होता हे पश्चिम महाराष्ट्रातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसून आले.

राज्यात, केंद्रात सत्ता नसतानाही जो पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपाने जिंकला तो हातातून घालवण्याची नामुष्की भाजपावर ओढवली यामागे अरुण लाड यांच्या व्यक्तिगत कष्टांचा मोठा वाटा आहे. गेल्यावेळच्या पराभवानंतरही ज्या चिकाटीने मतदारसंघ बांधण्यासाठी लाड निमूटपणे प्रयत्न करत राहिले त्याचे फळ २०२० मध्ये त्यांना भरभरून मिळाले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकदिलाने दिलेल्या साथीमुळे अगदी सहजपणे प्रचंड म्हणाव्या अशा मताधिक्याने लाड यांनी भाजपावर मात केली. मतदानाची टक्केवारी आणि मिळालेली मते पाहता भाजपाला फाजील आत्मविश्वास नडल्याचे स्पष्ट झाले.

चौकट

मराठा आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी श्रीमंत कोकाटे यांचा प्रचार केला. मराठा संघटनांचा पाठींबा असल्याचा दावाही करण्यात येत होता. मात्र पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज ‘राष्ट्रवादी’लाच साथ देत असल्याचे निकालाने सिद्ध केले. पुण्यात एकेकाळी २९ नगरसेवक निवडून आणणाऱ्या मनसेच्या रुपाली पाटील यांनाही मतदारांनी सपशेल नाकारले.

चौकट

ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करण्याची चूक पुन्हा एकदा भाजपाने केली. या पार्श्वभूमीवर ‘विनोदी बोलण्याचा लौकिक’ ही शरद पवार यांनी केलेली टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गांभिर्याने घ्यावी अशी आहे.

Web Title: Pune's result that brought down the swelling that came to BJP from power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.