पुणे महापालिकेच्या सोनोग्राफी मशिन्स धूळखात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 04:30 PM2018-10-11T16:30:20+5:302018-10-11T16:45:34+5:30
महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या सोनोग्राफी मशिन्सचा वापरच होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणे : महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या सोनोग्राफी मशिन्सचा वापरच होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या या मशिन्सवर केवळ गर्भवाढ संबंधित सोनोग्राफी केल्या जात असून, तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने अन्य कोणत्याही आजारांसाठी याचा वापर होत नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून घेतलेल्या मशिनचा योग्य वापर होत नाही, तर तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने अन्य आजारांसाठी सर्वसामान्य नागरिकांना खाजगी रुग्णलयात जाऊन सोनोग्राफी करावी लागत आहे. यामुळे मात्र पुणेकरांना दुहेरी भुर्दंड सहन करावा लागत आहे.
याबाबत सजग नागरिक मंचाने माहिती अधिकारामध्ये मिळविलेल्या माहिती नुसार, पुणे मनपाच्या १५ इस्पितळ व दवाखान्यांमध्ये सोनोग्राफी मशिन्स बसविण्यात आल्या आहेत. मात्र या मशिन्स चा वापर खरेदी केल्यापासूनच अत्यल्प होत आहे. यामध्ये २०१५ - १६ मध्ये प्रत्येक मशीन वर प्रत्येक महिन्यामध्ये सरासरी २० केसेस तपासण्यात आल्या. तर २०१६ - १७ मध्ये प्रत्येक महिन्यात सरासरी ३० केसेस तपासण्यात आल्या. तर जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या नऊ महिन्याच्या कालावधीत प्रति महा प्रति मशीन केवळ २० केसेस तपासण्यात आल्या आहेत. हेच प्रमाण खाजगी रुग्णालयांमध्ये एका मशीनवर एक महिन्यालाय तब्बल ७०० एवढे असते.
याबाबत अधिक चौकशी केली असता महापालिकेकडे संपूर्ण शहरासाठी केवळ एकच रेडिओलॉजिस्ट उपलब्ध आहे. तर महापालिकेच्या रुग्णालयात असलेले स्त्रीरोग्य तज्ज्ञ केवळ गर्भवाढी संदर्भांतील तपासण्यासाठी या सोनोग्राफी मशीनचा करू शकतात. यामुळे इतर रोगांची तपासणी या मशीवर होत नाही. याबाबत सजग नागरिक मंचाचे प्रमुख विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्तांना लेखी पत्र देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामध्ये त्यांनी जनतेच्या करांच्या पैश्यांची उधळपट्टी करून अकारण मोठ्या प्रमाणात सोनोग्राफी मशिन्स खरेदी करण्यात आल्या आहेत. मशीन खरेदी करण्यासाठी पुढाकार घेणा-या आरोग्य विभागाला मशिन्सचा अत्यल्प वापर होत असल्याचे गेल्या तीन वर्षांपासून वेळोवेळी लेखी पत्र दिली आहेत. परंतु अद्यापही याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
त्यामुळे आयुक्तांनी यामध्ये स्वत: लक्ष घालून आरोग्य खात्यास या सोनोग्राफी मशिन्स चा पुरेसा वापर करण्यासाठी भाग पाडावे व तोपर्यंत एकही नवीन सोनोग्राफी मशिन विकत घेऊ नये, अशी मागणी केली आहे.
----------------
पुणेकरांच्या पैशांच्या उधळपट्टी थांबवा
महापालिकेने शहरातील १५ इस्पितळ व दवाखान्यांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च सोनोग्राफी मशिन्स बसविण्यात आल्या. परंतु या मशीनचा महिन्याला सरासरी दहा टक्के देखील वापर केला जात नाही. या मशिनचा वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या तज्ज्ञ देखील महापालिकेकडे उपलब्ध नाहीत. याबाबत वेळोवेळी तक्रार करून देखील आरोग्य विभागाने याकडे लक्ष दिले नाही. त्यात नव्याने मशीन खरेदी करण्याचा घाट घातला जात आहे. पुणेकरांच्या पैशांची ही उधळपट्टी थांबवा.
-विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच