पुण्यातील एसटी, रेल्वे वाहतूक दिवसभर विस्कळीत, मुंबईतील पावसाचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 01:48 AM2018-07-10T01:48:39+5:302018-07-10T01:50:27+5:30
मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे एसटी व रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दोन्ही बाजूची वाहतुक विस्कळीत झाली असून एसटीच्या प्रवाशांना त्याचा अधिक फटका बसत आहे. मंगळवारीही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
पुणे : मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे एसटी व रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दोन्ही बाजूची वाहतुक विस्कळीत झाली असून एसटीच्या प्रवाशांना त्याचा अधिक फटका बसत आहे. मंगळवारीही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
पावसामुळे मुंबई, ठाणे शहरात ठिकठिकाणी पाणी साठले आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. पुणे व मुंबई दरम्यान एसटीच्या दररोज शेकडो फेऱ्या होतात. पण मुंबईतील रस्ते तुंबल्याने दोन्ही बाजुने एसटीच्या अनेक फेºया रद्द कराव्या लागल्या आहेत. तर बहुतेक गाड्या तब्बल तीन ते चार तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. सोमवारी सकाळपासूनच दोन्ही बाजुच्या बस विलंबाने धावत होत्या. पावसाचा जोर वाढून पाणी साठण्याचे प्रमाण वाढल्याने प्रत्येक बस उशिरा धावत होती.
दुपारनंतर वाहतुकीवर आणखी परिणाम झाल्याने काही फेºया रद्द कराव्या लागल्या. तसेच पावसामुळे प्रवाशांनाही पाठ फिरविली. परिणामी एसटीच्या उत्पन्नावरही परिणाम झाला. त्यामुळे प्रवाशांच्या गर्दीनुसार बस सोडण्यात आल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
मुंबईसाठी प्रामुख्याने स्वारगेट व शिवाजीनगर बसस्थानकातून बस सोडल्या जातात. शिवाजीनगर स्थानकातून दररोज १०० फेºया होतात. त्यापैकी सुमारे ३० फेºया रद्द कराव्या लागल्या. सर्वच गाड्या तीन ते चार तास उशिराने धावत होत्या. स्वारगेटमधील बसेसचीही जवळपास हीच स्थिती होती. मंगळवारीही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बस विलंबाने धावल्या तर काही फे-या रद्द करून आवश्यकतेनुसार बस सोडण्यात येतील, असेही एसटीतील अधिकाºयांनी सांगितले.
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी (दि. ९) पुण्यातून सुटणारी इंद्रायणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली. तसेच मंगळवारीही (दि. १०) मुंबईहून सुटणारी ही गाडी रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पुणे-मुंबई वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला आहे.
इंद्रायणी एक्सप्रेस वगळता या मार्गावर धावणारी एकही गाडी रद्द करण्यात आली नाही. मात्र, पावसामुळे बहुतेक गाड्या विलंबाने धावत होत्या. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. पुणे-भुसावळ एक्सप्रेस पनवेलऐवजी दौंड-मनमाड मार्गाने वळविण्यात आली. हवामान विभागाने मुंबईत आणखी दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मंगळवारीही रेल्वे वाहतुक काही प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे.