पुणे : दिव्यांगानीही व्यक्त केला पूजा खेडकरवर रोष, कारवाईची मागणी
By राजू इनामदार | Published: July 13, 2024 03:26 PM2024-07-13T15:26:22+5:302024-07-13T15:27:48+5:30
दिव्यांग कल्याण आयुक्तांना निवेदन: कठोर कारवाईची मागणी
पुणे: वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची त्वरीत चौकशी करावी. त्यांनी खोटी दिव्यांग असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून आयएएस पद मिळवल्याचे निष्पन्न झाले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, संबधित अधिकाऱ्यांनाही मोकळे सोडू नये अशी मागणी दिव्यांग नागरिकांनी राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त डॉ. प्रवीण पुरी यांच्याकडे केली.
दृष्टिदोष असल्याचे प्रमाणपत्र सादर करून परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी परीक्षेत वरची श्रेणी मिळवली असल्याची चर्चा आहे. खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बरेच आकांडतांडव करून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कार्यालय बळकावले, खासगी गाडीवर सरकारी अंबर दिवा लागला असे बरेच आरोप त्यांच्यावर होत असून थेट पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याचा अहवाल मागवला आहे.
याचसंदर्भात दिव्यांगांच्या संघटनांचे प्रतिनिधी रफिक खान, धर्मेंद्र सातव सुरेखा ढवळे सुनंदा बाम्हणे विष्णूपंत गुंडाळ सुप्रिया लोखंडे यावेळी उपस्थित होते. खान यांनी सांगितले की दिव्यांग चा संघर्ष जन्मापासुनच सुरु होतो. तो शाळेत, महाविद्यालयात आपले शिक्षण कसे पूर्ण करतो त्यालाच माहिती, त्यानंतर नोकरीसाठीही त्याला संघर्षच करावा लागतो. खोट्या प्रमाणपत्रांमुळे खऱा दिव्यांग त्याच्या न्याय हक्कापासून वंचित राहतो. त्यामुळे हा गंभीर स्वरूपाचा सामाजिक गुन्हा आहे. आकाश कुंभार यांनी यावेळी असे किती लोक आहेत, त्याची त्वरीत चौकशी करण्याची मागणी केली. डॉ. पुरी यांना त्यांना चौकशीचे आश्वासन दिले.