बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी दोघांना शिक्षा
By Admin | Published: May 13, 2017 04:18 AM2017-05-13T04:18:55+5:302017-05-13T04:18:55+5:30
शाळा सोडल्याच्या दाखल्यात जन्म तारीख, नोंदणी तारीख; तसेच नावात बदल करून, बनावट छायांकित प्रतींद्वारे जातीचा दाखला
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : शाळा सोडल्याच्या दाखल्यात जन्म तारीख, नोंदणी तारीख; तसेच नावात बदल करून, बनावट छायांकित प्रतींद्वारे जातीचा दाखला काढणाऱ्या दोघांना दोन वर्षांचा साधा कारावास, तसेच प्रत्येकी ३ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्यातून फिरत्या शाळेचे मुख्याध्यापक संदीप मुळीक यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. बारामतीचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. के . दुगावकर यांनी हे आदेश दिले.
किरण महादेव नरूटे (रा. पिंपळी, ता. बारामती) रहीमतुल्ला उर्फ रमजान वजीरभाई इनामदार (रा. देऊळगाव रसाळ, ता. बारामती) अशी दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांची नावे आहेत.
तत्कालीन नायब तहसीलदार बंडू जयराव गोरे यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी २ जून २००८ रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. खांडेकर यांनी तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले होते. फिर्यादी पक्षातर्फे यावेळी सात साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षी पुरावे ग्राह्य धरून प्रथम न्यायदंडाधिकारी एक. के. दुगावकर यांनी दोघांना दोन वर्षे साधा कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी वकील अॅड. फिरोज बागवान यांनी काम पाहिले. त्यांना सुभाष काळोखे, निश्चल शितोळे यांनी सहकार्य केले.