महिला कर्मचाऱ्यांना ‘वाड्यावर या’ म्हणणार्या पोलीस उपनिरीक्षकाला मिळाली ' ही ' शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 09:55 PM2020-07-30T21:55:44+5:302020-07-30T21:56:26+5:30
महिला पोलिसांनी याबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार केली होती.
पुणे : शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना वाड्यावरती भेटायला या असे बोलणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अपर पोलीस आयुक्तांनी शिक्षा सुनावली आहे.
शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील पोलीस उपनिरीक्षक अशोक टोके असे त्यांचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी, टोके हे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. ते तेथे काम करणार्या महिला पोलीस कर्मचार्यांना तुम्ही वाड्यावरती भेटायला या असे म्हणत असे. याबाबत या महिलांनी पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार केली होती. या तक्रार अर्जांची सहायक पोलीस आयुक्तांनी चौकशी केली. त्याचा चौकशी अहवाल अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी सादर केला होता. अशोक टोके यांनी दिलेला खुलासा समाधानकारक वाटला नाही. वाडा हा शब्दप्रयोग महिला बाबतीत करणे उचित नसून चौकशी अहवालामध्ये टोके यांची कसुरी निष्पन्न झाली आहे. त्यामुळे त्यांना १ वर्षे वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता गमतीतही कोणी वाड्यावर या असे म्हणू नये.