सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई; दोन दिवसांत तब्बल ८८ हजारांचा दंड केला वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 08:38 PM2021-07-11T20:38:28+5:302021-07-11T20:38:36+5:30
खडकवासला धरण चौपाटीवर कडक नाकाबंदी, हवेली पोलीसांच्या वतीने १७७ जणांवर दंडात्मक कारवाई
धायरी: मागील रविवारी झालेली पर्यटकांची गर्दी आणि त्यामध्ये झालेले कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन या पार्श्वभूमीवर हवेली पोलिसांकडून या आठवड्यात नियम मोडून येणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. शनिवार व रविवार या दोन दिवसांत तब्बल ८८ हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करीत हवेली पोलीसांच्या वतीने १७७ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पावसाळ्यात शनिवार-रविवारसह इतर दिवशी पर्यटकांची पावलं धरणांकडे वळतात. पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. पर्यटन स्थळांवर कोणीही नियम मोडून फिरण्यासाठी येऊ नये, असे आवाहन हवेली पोलिसांच्या वतीने वेळोवेळी करण्यात येत असले तरीही पर्यटक येत असल्याने पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.
पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी हवेली पोलिसांकडून शनिवार व रविवार असे आठवड्यातील दोन दिवस कडक नाकाबंदी करण्यात येत आहे.
सिंहगडच्या आसपास अनके ठिकाणी कडक बंदोबस्त आणि नाकाबंदी
सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा, गोळेवाडी चेक पोस्ट, नांदेड फाटा, खडकवासला धरण चौक, खेड शिवापूरकडून येणाऱ्या कोंढणपूर फाटा अशा ठिकाणी कडक बंदोबस्त आणि नाकाबंदी करण्यात येत आहे. त्याचबरोबर वाहनांची तपासणी करून प्रत्येक पर्यटकाला पाचशे रुपये दंड तर करण्यात येत आहेच, शिवाय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम १८८ नुसार गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही नियम मोडून फिरण्यासाठी येऊ नये, असे आवाहन हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी केले आहे.