पुणेकर म्हणतात, कामात नाविन्य ते काय?; केवळ गाजावाजा जास्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 01:04 AM2018-09-03T01:04:05+5:302018-09-03T01:04:23+5:30
महापालिका करत असलेली कामे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी करत असल्याने त्यात नाविन्य ते काय?, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.
- राजू इनामदार
पुणे : महापालिका करत असलेली कामे पुणेस्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी करत असल्याने त्यात नाविन्य ते काय?, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.
विशेष क्षेत्र म्हणून औंध-बाणेर-बालेवाडी परिसराची निवड करण्यात आली. ती पुणेकरांनी केल्याचे दाखवण्यात आले, मात्र त्यासाठी अर्ज भरून घेणे वगैरे प्रक्रिया संशयास्पद होती. काही लाख लोकांनी हे विशेष क्षेत्र निवडले, यावर आजही पुणेकरांचा विश्वास नाही.
दोन वर्षात कंपनीने एकूण ५८ प्रकल्प जाहीर केले. त्यापैकी एकही प्रकल्प महापालिका करू शकणार नाही, असा नाही. सायकल शेअरिंगपासून ते रस्त्यावर वायफाय सेंटर्स तयार करण्यापर्यंत सगळी कामे महापालिका करतेच आहे. स्मार्ट सिटीचे काम कमी व त्याची ब्रँण्डिंगच जास्त असा प्रकार सुरू आहे.
५८ योजनांपैकी डिस्प्ले बोर्ड, वायफाय सेंटर्स, कौशल्य विकास केंद्र, ग्रीन पार्क, सायकल शेअरिंग, मॉडेल रोड अशा काही मोजक्याच योजना वगळता दृश्य स्वरुपातील व नाव घ्यावे, अशी एकही योजना स्मार्ट सिटी कंपनीकडून झालेली नाही. अॅडाप्टिव्ह म्हणजे सेन्सर बसवलेल्या सिग्नल्सचे स्वप्न दाखवण्यात आले. ई- बस सुरू करणार सांगण्यात आले, पण निविदांच्या स्तरावरच हे सर्व कोसळले.
संचालक मंडळात लोकप्रतिनिधींचे वर्चस्व नको म्हणून त्यांची संख्या ७ व सरकारी अधिकाऱ्यांची ८ करण्यात आली, पण भाजपाच्याच पालिकेतील संचालकांपैकी काहींनी त्रुटी दाखवल्यामुळे काही योजना तिथेच थांबून राहिल्या आहेत. फक्त ११ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. १९ सुरू आहेत. ९ निविदा प्रक्रियेत आहेत. १३ प्रकल्पांचा डीपीआर तयार झाला आहे व ६ अगदीच प्राथमिक चर्चेत आहेत.