पुरंदर विमानतळ : आपल्याला गृहीत धरल्याची शेतकºयांची खंत; पारगावला केला तीव्र निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 05:48 AM2018-01-25T05:48:57+5:302018-01-25T05:49:20+5:30
पुरंदर विमानतळाला हवाई दलाची शेवटची परवानगी मिळाली आहे. आता भूसंपादनास सुरुवात होईल, अशी परिस्थिती आहे. मात्र, विमानतळास जमिनी देण्यास स्थानिक बाधित शेतक-यांचा विरोध कायम आहे. आज सकाळी त्यांनी पारगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर विमानतळविरोधातील फलक हातात घेऊन विमानतळाला विरोध दर्शविला.
जेजुरी : पुरंदर विमानतळाला हवाई दलाची शेवटची परवानगी मिळाली आहे. आता भूसंपादनास सुरुवात होईल, अशी परिस्थिती आहे. मात्र, विमानतळास जमिनी देण्यास स्थानिक बाधित शेतक-यांचा विरोध कायम आहे. आज सकाळी त्यांनी पारगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर विमानतळविरोधातील फलक हातात घेऊन विमानतळाला विरोध दर्शविला.
पुरंदर तालुक्यातील पारगाव, एखतपूर, खानवडी, मंजवडी, कुंभारवळण, वनपुरी व उदाचीवाडी या सात गावांच्या परिसरातील सुमारे सहा हजार एकर क्षेत्रावर छत्रपती संभाजीराजे विमानतळ उभारण्यात येणार आहे. विमानतळ
उभारण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने यापूर्वीच सर्व परवानग्या दिलेल्या आहेत; मात्र हवाई दलाची परवानगी मिळत नसल्याने विमानतळाचे काम अडले होते.
आज हवाई दलानेही पुरंदर विमानतळाचे काम पूर्ण झाल्यावर लोहगाव विमातळावरून खासगी मालकीची तसेच नागरी वाहतूक करणाºया विमानांची उड्डाणे बंद करण्याच्या अटीवर ना हरकत दाखला दिला असल्याचे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणकडून सांगण्यात आले.
त्यानंतर पुन्हा एकदा बाधित शेतकºयांनी आपला विरोध सुरू केला आहे. आज सकाळी पारगाव येथे परिसरातील बाधित शेतकºयांनी पारगावचे सरपंच सर्जेराव मेमाणे, माजी सरपंच व तंटामुक्ती ग्राम समितीचे अध्यक्ष विठ्ठल मेमाणे, पांडुरंग मेमाणे, लक्ष्मण गायकवाड, रामदास महाडिक, शांताराम सावंत, लक्ष्मण बोरावके आदींसह एकत्र येऊन विमानतळविरोधी फलक फडकावीत शासनाचा निषेध केला आहे.
‘इडा-पीडा टळू दे - विमानतळ जाऊ दे’, ‘जमीन आमच्या हकाची - नाही कोणाच्या बापाची’, ‘जमिनीसाठी जबरदस्ती करू नका - आमच्या जमिनी घेऊ नका’ अशा घोषणा देत निषेध करण्यात आला. शासन आम्हाला न विचारता, आमची भूमिका समजून न घेता विमानतळाचा प्रकल्प पुढे रेटत आहे.
कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या जमिनी देणार नाही. प्रसंगी प्राणांची आहुती देण्याचीही आमची तयारी असल्याचे सांगत बाधित शेतकºयांनी पुन्हा विरोध नोंदविला आहे.
का आहे विरोध?
पुरंदर तालुक्यातील हा परिसर तसा अवर्षणग्रस्तच होता. पाऊस पडलाच तर येथील शेती पिकत होती.
आता मात्र हा परिसर जमिनी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्यावर सुजलाम्-सुफलाम् झाला आहे. येथे आता बागायती जमिनी निर्माण झाल्या आहेत.
नगदी उत्पन्न देणारी पिके, फळबागा, ऊस आदी पिकांतून या परिसरातील शेतकºयांनी आपले संसार फुलवले आहेत.
आधुनिक शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय येथील शेतकरी करू लागल्याने येथून विमानतळाला मोठा विरोध निर्माण झालेला आहे.