पुरंदर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार; भूसंपादनासाठी राज्य सरकारमार्फत प्रयत्न करू- मुरलीधर मोहोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 12:17 PM2024-06-16T12:17:48+5:302024-06-16T12:18:03+5:30
डीजीसीए, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी यांची एकत्रित बैठक घेऊन जागेची पाहणी केली जाणार
पुणे : पुरंदरविमानतळाचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. विमानतळासाठी एनओसी मिळाली आहे. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल अथॉरिटीने (डीजीसीए)देखील विमानतळाला मान्यता दिली आहे. पुढील काळात भूसंपादनासाठी राज्य सरकारमार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. डीजीसीए, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी यांची एकत्रित बैठक घेऊन जागेची पाहणी केली जाणार आहे. ही प्रक्रिया वेगाने केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागलेल्या खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर यांच्या हस्ते मोहोळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते. त्यावेळी मोहोळ बोलत होते.
मोहोळ म्हणाले, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडने २०१८ मध्ये केंद्राच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे पुरंदर विमानतळाचा प्रस्ताव पाठवला होता. महायुती सरकारच्या काळात पुरंदर विमानतळासाठी साइट १ ए ही जागा ठरविण्यात आली होती. विमानतळाचा प्रस्ताव मंजूरही झाला होता. परंतु, २०२१ मध्ये सरकार बदलले. त्या सरकारने स्थानिक मुद्यांचा विचार करून ५ ए नावाने नवीन जागा शोधली. हा सुधारित प्रस्ताव नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे देण्यात आला. मात्र तांत्रिक अडचणीमुळे काम सुरू झाले नाही. पुन्हा २०२३ ला सरकार बदलल्यानंतर त्यांनी पहिल्याच जागेचा आग्रह केला. १ ए चा प्रस्ताव पुन्हा पाठविण्यात आला. मे २०२४ मध्ये एमओडीनेसुद्धा एमएडीसीला एनओसी दिली. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल अथॉरिटीने (डीजीसीए) पुरंदर विमानतळाला मान्यता दिली आहे. हे काम निश्चितपणे पुढे जाईल.
पुणे विमानतळाच्या रन-वे चा विस्तार
पुणे विमानतळाच्या रन-वे चा विस्तार करण्यासंबंधी रविवारी (दि. १६) विमानतळ अथॉरिटी आणि विभागीय आयुक्तांची बैठक बोलावली आहे. पुण्याची लोकसंख्या ६० लाखांच्या आसपास झाली आहे. पुणे विमानतळाच्या रन-वे चा विस्तार करण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र म्हणावे तसे काम होऊ शकले नाही. रन-वे च्या विस्तारासाठी ३५ एकर जागेची आवश्यकता आहे. भूसंपादनासाठी आता नागरी नागरी हवाई उड्डाण मंत्रालय, एमओडी आणि एमएडीसी यांची एकत्रित बैठक घेणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची लवकरच भेट घेतली जाईल.
नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होईल
पुरंदरच्या विमानतळाला काहीसा वेळ लागेल. पण नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पश्चिम महाराष्ट्राला फायदाच होईल. टीपीपी मॉडेलवर होणाऱ्या या विमानतळाला जुलै २००७ मध्ये केंद्राची मान्यता मिळाली. एका वर्षात २ कोटी प्रवासी प्रवास करू शकतील इतकी याची क्षमता आहे. या विमानतळाचे काम ७१ टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०१४ ला विमानतळाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मार्च २०२५ पर्यंत या विमानतळाचे काम पूर्ण होईल.
पुणे टर्मिनल लवकरच सुरू होईल
पुणे टर्मिनलचे काम झाले आहे. मात्र ते चालू होत नाही. कारण टर्मिनलसाठी सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ)चे मनुष्यबळ मिळत नव्हते. यासंबंधी आम्ही लवकरात लवकर मनुष्यबळ दिले जावे, असे पत्र दिले आहे. जेणेकरून काही दिवसात टर्मिनल सुरू होईल.
लवकरच नवीन राष्ट्रीय सहकारी धोरण जाहीर होणार
नवीन राष्ट्रीय सहकारी धोरण आखण्यात आले आहे. लवकरच ते जाहीर होईल. सहकारातून समाज समृद्ध करणे, शेतकरी आत्मनिर्भर करणे, तळागाळातील सहकारी संस्था मजबूत करणे यांचा धोरणात समावेश आहे. सहकारावर आता एका विशिष्ट वर्गाचे वर्चस्व राहिलेले नसल्याचेही मोहोळ म्हणाले.