पुरंदर विमानतळासाठी चार महिन्यांत भूसंपादन सुरु करणार : देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 08:28 PM2018-11-16T20:28:43+5:302018-11-16T20:35:18+5:30
पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्व प्रकारच्या मान्यता मिळाल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.
पुणे : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी येत्या चार महिन्यांत जमीन भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. तसेच विमानतळ परिसरात नगर रचना विभागाच्या नियमाप्रमाणे एक उत्तम शहर (सिटी) उभारणार आहे, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात कार्यक्रमप्रसंगी दिले.
पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) ‘महाळुंगे-माण हायटेक सिटी’ ६२० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्व प्रकारच्या मान्यता मिळाल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. विमानतळासाठी लागणाऱ्या जमीन भूसंपादन कसे करायचे याचे नियोजन पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे करत आहेत. त्याचबरोबर या विमानतळाच्या परिसरात विमानतळ शहर (सिटी) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी नगर रचनेच्या नियमांनुसार (टीपी स्कीम) प्रारूप आराखडा तयार करण्यात येणार आहे.
केवळ सिमेंट कॉँक्रिटचे जंगल उभे न करता त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विचार करून अत्याधुनिक सर्व सुविधा असलेले असे हे विमानतळ शहर असणार आहे. या विमानतळ सिटीमध्ये सुनियोजित पक्के रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पाणीपुरवठा, शाळा, बगीचे, दवाखाने, विद्यूतीकरण, इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितले.
विमानतळासाठी नियोजन सुरू आहे. जेणेकरून या ठिकाणी अधिकाधिक गुंतवणूक वाढेल. यासाठी तीन-चार सरकारी कंपन्या एकत्रित काम करत असून, हा विषय अंतिम टप्प्यात असल्याचे फडणवीस याप्रसंगी म्हणाले.
....................
खडकवासला ते फुरसुंगी टनेल बांधा
पुणे शहराची पुढील काही वर्षांत होणारी वाढ लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मुळशी धरणातील पाणी भीमा पात्रात सोडून ते पाणी पूर्व भागातील तालुक्यांना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पुढाकार घ्यावा. तसेच पाण्याची होणारी गळती थांबविण्यासाठी खडकवासला ते फुरसुंगी असा किलोमीटर टनेल बांधावा. त्यामुळे जवळपास ३ टीएमसी पाणी बचत यामधून होईल, अशा प्रमुख मागण्या जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत.
................
पीएमआरडीएची स्थापना होऊन तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षांत मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. रिंगरोड, मेट्रो आणि टाऊन प्लनिंगच्या १४ योजना प्रामुख्याने करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यातील ३२ किलोमीटरच्या रिंगरोडचे काम सुरू असून, लवकरच पुढील दोन महिन्यांत ते पूर्ण होईल. पीएमआरडीएच्या वतीने शेतकऱ्यांना श्रीमंत करणारे प्रकल्प राबविण्यात येत आहे.
- गिरीश बापट, पालकमंत्री, पुणे