विमानतळाचे काम तीन वर्षांत मार्गी लावू : सौरभ राव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 02:39 PM2018-03-23T14:39:03+5:302018-03-23T14:39:03+5:30
जिल्ह्यात विमानतळासाठी जागा निवडताना सुमारे ११ ठिकाणांची पाहणी करण्यात आली. प्रत्येक जागेचा हवाई सर्व्हे करण्यात आला. प्रत्येक जागेचे गुणदोष यांचा अभ्यास केल्यानंतर पुरंदर तालुक्यातील जागा विमानतळासाठी निश्चित करण्यात आली.
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा असलेल्या व जिल्हा आणि शहराच्या विकासाचा मानबिंदू ठरणारे पुण्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्यातच होणार असल्याचे स्पष्ट करत येत्या तीन वर्षांत हे काम मार्गी लागेल, असे स्पष्ट मत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी येथे व्यक्त केले. विमानतळाला नागरिकांचा विरोध नसून, शासनाच्या वतीने जास्तीत जास्त चांगल्या पुनर्वसनाची अपेक्षा आहे. जिल्हा प्रशासन म्हणून नागरिकांचे कवडीचे नुकसान न करता सर्वांत चांगले पॅकेज देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात
आलेल्या वार्तालापाच्या कार्यक्रमात सौरभ राव यांनी ही माहिती दिली. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुमारे २७०० ते २८०० हेक्टर जागेची आवश्यकता आहे. यासाठीचे भूसंपादन करताना स्थानिक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगले पॅकेज देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याशिवाय बाधित कुटुंबातील युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन विमानतळामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात विमानतळासाठी जागा निवडताना सुमारे ११ ठिकाणांची पाहणी करण्यात आली. प्रत्येक जागेचा हवाई सर्व्हे करण्यात आला. प्रत्येक जागेचे गुणदोष यांचा अभ्यास केल्यानंतर पुरंदर तालुक्यातील जागा विमानतळासाठी निश्चित करण्यात आली. पुरंदर विमानतळाचे भूसंपादन आणि प्रत्यक्ष विमानतळ सुरू होण्यासाठी तीन ते चार वर्षे लागतील. तोपर्यंत या गावांमधील युवक-युवतींना विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी आराखडा करण्यात येत आहे. याठिकाणी रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत. त्याठिकाणी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. हा पुनर्वसन धोरणाचा एक भाग असल्याचे राव यांनी सांगितले. संरक्षणाची जबाबदारी हवाई दलाकडे लोहगाव विमानतळावरून रोज ११० प्रवासी विमाने ये-जा करतात. तर संरक्षण विभागाची फक्त ८ विमानांची ये-जा होते. लोहगाव विमानतळावरून ९२ टक्के नागरी उड्डाणे आहेत. तर संरक्षण विभागातील आठ टक्के विमानांचे उड्डाण होते. लोहगाव विमानतळ संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मुंबईवरील संरक्षणाची जबाबदारी लोहगाव विमानतळावरील हवाई दलाकडे आहे.