पुरंदर, बारामतीत सर्वाधिक पाणीटंचाई, जिल्ह्यात १७२ टँकरद्वारे अडीच लाख लोकसंख्येची तहान भागवली जातीये
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 10:26 AM2024-05-03T10:26:06+5:302024-05-03T10:26:42+5:30
पुरंदर, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड तालुक्यात सध्या टंचाई जाणवत असून टँकरने पाणीपुरवठा सुरु
पुणे : ऐन निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातच पुरंदर आणि बारामती तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. पुरंदरमध्ये ७२, तर बारामतीत २१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर सबंध जिल्ह्यात १७२ टँकरने १४० गावांसह ८४७ वाड्यावस्त्यांमधील अडीच लाख लोकसंख्या व सुमारे दीड लाख जनावरांचीही तहान टँकरने भागविली जात आहे.
जिल्ह्यात डिसेंबरपासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे नद्या, ओढ्यांमध्ये पाणीसाठा कमी झाला. जिल्ह्यामध्ये सुरुवातीला पुरंदर तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली. त्यानंतर बारामती, दौंड अशा काही तालुक्यांत टंचाईला सुरुवात झाली. गेल्या चार महिन्यांत पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून टँकरच्या संख्येतही वाढ झाली आहे. मेच्या पहिल्या दिवशीच पुरंदर आणि बारामती या दोन तालुक्यांत सर्वाधिक पाणीटंचाई आहे. पुरंदरमध्ये ७२ तर बारामतीत २१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यापाठोपाठ भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड तालुक्यात सध्या टंचाई जाणवत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी टँकरने नागरिकांची तहान भागविली जात आहे. मावळ, मुळशी आणि वेल्हे तालुक्यात एकही टँकर सुरू नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. या पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील अडीच लाख लोकसंख्या तहानलेली आहे. त्याशिवाय १ लाख ६७ हजार ९४ इतक्या जनावरांनाही याचा फटका बसला आहे.
जिल्ह्यातील टँकरची सद्य:स्थिती
तालुका- टँकर गावे वाड्या वस्त्या
आंबेगाव २० २३ १२१
बारामती २१ २० १२९
भोर ९ ९ ३
दौंड ९ ६ ७२
हवेली . ८ ९ १५
इंदापूर ४ ४ १५
जुन्नर १४ १६ ८१
खेड ४ ४ ३४
पुरंदर ७२ ४६ ४७
शिरुर ११ ३ ३०
एकूण १७२ १४० ८४७