Pune News: आमदार संजय जगताप करणार आमरण उपोषण; महावितरणविरोधात ३ जुलैपासून एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 05:20 PM2023-06-30T17:20:05+5:302023-06-30T17:21:54+5:30

पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप सासवड येथील शिवतीर्थावर आमरण उपोषणाला बसणार...

purandar MLA Sanjay Jagtap will fast to death; Elgar from July 3 against Mahadistribution | Pune News: आमदार संजय जगताप करणार आमरण उपोषण; महावितरणविरोधात ३ जुलैपासून एल्गार

Pune News: आमदार संजय जगताप करणार आमरण उपोषण; महावितरणविरोधात ३ जुलैपासून एल्गार

googlenewsNext

सासवड (पुणे) :पुरंदर तालुक्यात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, अरेरावीचे धोरण, अकार्यक्षमता याच्याविरोधात दि. ३ जुलैपासून पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप सासवड येथील शिवतीर्थावर आमरण उपोषणाला बसणार आहेत.

या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नागरिक, शेतकरी, व्यावसायिक आदी ज्यांच्या महावितरणबाबत काही तक्रारी, अडचणी असल्यास त्यांनी पुरंदर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात, तसेच माझ्या कार्यालयात लेखी स्वरूपात अडचणी मांडाव्यात, तसेच हे आंदोलन कोणत्याही एका विशिष्ट पक्षाचे नसून महावितरणकडून त्रास होत असलेल्या प्रत्येक घटकासाठी असल्याने या जनआक्रोश आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले आहे.

महावितरणच्या भ्रष्ट आणि भोंगळ कारभाराविरोधात आमदार संजय जगताप यांनी जनआंदोलन छेडत थेट आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे. याबाबत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी गुरुवारी शेतकरी आणि नागरिकांसोबत नियोजनाची बैठक झाली. यामध्ये आमदार संजय जगताप यांनी सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना महावितरणबाबत असलेल्या अडचणी मांडण्याचे आवाहन करीत याबाबत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या जास्तीत जास्त अडचणी समोर याव्यात, यासाठी जनजागृती करण्याबाबत सूचना दिल्या.

गेल्या वर्षभरात अनेकदा महावितरणच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारी, तसेच निदर्शनास आलेल्या बाबींबाबत संबंधित अधिकाऱ्यांना लेखी आणि तोंडी सांगून त्यांच्या वर्तनात आणि कारभारात फरक पडला नाही. शासनाची मंजूर असलेली ८६ रोहित्र सर्वसामान्य नागरिकांसाठी न बसविता ती व्यावसायिक आणि कारखानदारांच्या सोयीसाठी भ्रष्टाचार करून बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. वीजजोड, खांब, तारा, मीटर देण्यास नेहमीच दिरंगाई होत आहे.

शेतीपंपाचे मीटर रीडिंग न घेता अंदाजे हजारो रुपयांचे वीजबिल शेतकऱ्यांच्या माथी मारून ती भरण्यासाठी दबाव आणला जात आहे. या आणि यासारख्या अनेक अडचणी महावितरणकडून निर्माण करून ग्राहकांना मनस्ताप देण्यात येत असून, महावितरणच्या या भोंगळ कारभाराचा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा समाजातील सर्वच घटकांना होत असलेला त्रास थांबविण्यासाठी, अधिकाऱ्यांचा मुजोरपणा आणि भ्रष्ट कारभार मोडीत काढून त्यांना वठणीवर आणण्यासाठी मला नाइलाजाने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे आमदार संजय जगताप यांनी याप्रसंगी सांगितले.

आंबोडी येथील मागासवर्गीय वस्ती गोल्या २ वर्षांपासून डीपीच्या प्रतीक्षेत आहे; मात्र या ठिकाणी डीपी न बसविता जवळील हॉटेलसाठी अनके खांब टाकून तातडीने डीपी बसवून वीजजोड दिल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. महावितरणचे सासवड येथील सहायक अभियंता आणि दिवे येथील सहायक अभियंता यांच्या अरेरावीच्या तक्रारी असून, या दोघांवर कारवाई करणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.

Web Title: purandar MLA Sanjay Jagtap will fast to death; Elgar from July 3 against Mahadistribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.