पुरंदरचे डाळिंब निघाले युरोपीय बाजारपेठेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 01:57 AM2019-01-30T01:57:40+5:302019-01-30T01:58:33+5:30
खडतर परिस्थितीवर युवकाची मात; माळरानावर फुलल्या बागा
नीरा : पुरंदरच्या दक्षिण-पूर्व पट्टा हा कायम अवर्षणग्रस्त दुष्काळ पाचवीला पुजल्यासारखी अवस्था. आजही बारा महिने प्यायला पाणी नाही. मात्र येथील युवकांनी या खडतर परिस्थितीवर मात करीत माळरानावर डाळिंबाच्या बागा फुलवल्या आहेत. पंधरा वर्षांपूर्वी डाळिंबाची लागवड केल्यानंतर स्थानिक बाजारपेठेत तसेच राज्याबाहेर डाळिंबाची विक्री केली. यावर्षी विषमुक्त डाळिंबाची संकल्पना यशस्वीरीत्या पेलून युरोपच्या बाजारपेठेत ती पाठवली जात आहेत.
गुळुंचे, राख, कर्नलवाडी व वाल्हा गावच्या पूर्वेकडील वाड्या-वस्त्यांवरील युवकांना वडिलोपार्जित शेती मोठ्या प्रमाणावर आहे. पण सततच्या दुष्काळामुळे शेती विकून दुसरा व्यवसाय करण्याच्या परिस्थितीत असलेल्या या तरुणांनी आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नीरा डाव्या कालव्याशेजारी विहीर घेऊन पाइपलाइन करून शेततळ्यात पाणी साठवून ठिबक सिंचनाद्वारे डाळिंबाची बागा फुलवल्या आहेत. मागील आठ-दहा वर्षांत या भागातील डाळिंब देशभरातील बाजारपेठेत विक्रीसाठी जात होती. हवामानाच्या लहरीपणामुळे वेगवेगळे प्रयोग करून फळ कसे दर्जेदार करता येईल, हे पाहिले जाते.
कर्नलवाडीचे युवकांनी यावर्षी आपले डाळिंब परदेशात पाठवायचे, हा निश्चय केला. कोणतीही विषारी औषधांची फवारणी न करता (रेड्यूस फ्री) फळ तयार करून लंडन, आखाती देशात किंवा युरोपियन देशात निर्यात करण्यासाठी प्रयत्न केले. कुरकुंभ येथील भारतीय निर्यातदार आय. एन. आय. फार्मसी या कंपनीमार्फत कालपासून सत्यवान निगडे यांच्या डाळिंबाची निर्यातीसाठी तोड सुरू झाली आहे. सत्यवान निगडे यांच्यासह कर्नलवाडीतील सुधीर निगडे, पृथ्वीराज निगडे, दीपक जगताप, प्रमोद निगडे, ताराचंद निगडे, बाळासाहेब रणनवरे, ज्ञानेश्वर निगडे, विराज निगडे या तरुण शेतकऱ्यांचे डाळिंब युरोपियन देशांमध्ये जाण्यासाठी सध्या पात्र ठरले असून पुढील काळात यांचे डाळिंब युरोपियन देशांच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जाणार आहेत.
भारतीय बाजारपेठेतून डाळिंबाच्या भावातील चढउतारामुळे आम्हाला अनेकदा तोट्यातच फळबागा सांभाळाव्या लागत. २०१२ पासून उत्तम प्रतीची फळबाग आणि फळे मिळवून नवीन तंत्रज्ञान, शेणखत आणि जैविक खते औषधांचा वापर करून फळबागा फुलवण्यास सुरुवात केली. पुरंदर कृषी खात्याकडून वारंवार मार्गदर्शन घेऊन आपल्या शेतातील डाळिंब परदेशात विक्रीस पाठवण्याचा प्रयत्न करीत होता. आज युरोपला आमचे डाळिंब जात आहे, याचा आनंद आहे.
- सत्यवान जगन्नाथ निगडे, डाळिंब उत्पादक
रेस्युडी फ्री डाळिंब करण्यात निगडेंचा हातखंडा आहे. त्याचं डाळिंब युरोपियन देशांत जायचा मार्ग मिळाला आहे, ९६ रुपये प्रतिकिलो दराने निगडे यांचे चाळीस टन डाळिंब निर्यात होणार आहे. या परिसरातून मोठ्या प्रमाणावर डाळिंब निर्यात होऊ शकते, त्यामुळे हा परिसर डाळिंबाचे आगार होऊ पाहत आहे. कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर योजनेतून शेतकºयांना डाळिंब लागवडीसाठी अनुदान व सल्ले दिले जात आहेत.
-राजेंद्र नलवडे, मंडल कृषी अधिकारी जेजुरी