विमानतळ विरोधासाठी पुरंदरचे रस्ते रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:17 AM2018-08-07T01:17:55+5:302018-08-07T01:18:05+5:30

पुरंदर विमातळाविरोधात स्थानिक शेतकरी आक्रमक होत आहेत.

Purandar road to protest against the airport | विमानतळ विरोधासाठी पुरंदरचे रस्ते रोखले

विमानतळ विरोधासाठी पुरंदरचे रस्ते रोखले

Next

वाघापूर : पुरंदर विमातळाविरोधात स्थानिक शेतकरी आक्रमक होत आहेत. सोमवारी पूर्व भागातील सर्व रस्ते प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी सकाळपासून रोखून धरले. सकाळी १० पासून दुपारी २ पर्यंत बैलगाड्या आणि गुराढोरांसह ते रस्त्यावर उतरले. रस्त्यावरच दगडांच्या चुली करून स्वयंपाक करण्यात आला, तर अनेक ठिकाणी शासनाचा गोंधळ घालण्यात आला. तसेच, हातात काळे झेंडे घेऊन शासनाविरोधात घोषणा देत जोरदार निषेध करण्यात आला.
दरम्यान, शेतकºयांनी आंदोलन करू नये, यासाठी पोलिसांनी दबावतंत्राचा वापर केला. रविवारी रात्री प्रत्येक गावात फिरून आंदोलन केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या. तसेच, सकाळीही गावोगावी पोलिसांनी पिंजरे उभे करून पुन्हा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या निर्णयावर ठाम असलेले शेतकरी पोलिसांच्या दबावतंत्राला झुगारून हजारोंच्या संख्येने रस्त्यावर आले. त्यांनी संपूर्ण रस्ते ३ ते ४ तास रोखून धरले. सासवड-वाघापूर, पिसर्वे-सासवड, कुंभारवळण-पारगाव, एखतपूर-खानवडी, उरुळी कांचन-जेजुरी असे सर्व रस्ते ब्लॉक केले व शेतकरी एक झाल्यास काय होऊ शकते, हे दाखवून दिले. तर, जेजुरीच्या पोलीस अधिकाºयांनी गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊनही शेतकरी रस्त्यावरून हटले नाहीत. शेवटी त्यांनाच अशी कोणतीही कारवाई केली नसल्याचा खुलासा द्यावा लागला.
वनपुरी येथे सासवड-वाघापूर रस्त्यावर सरपंच नामदेव कुंभारकर आणि उदाचीवाडी गावाचे सरपंच यांच्यासह शेतकºयांनी तब्बल ३ तास रस्ता रोखून धरला. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषद सदस्य आणि विमानतळविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्तात्रय झुरंगे, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, माजी सरपंच रामदास कुंभारकर, एकनाथ कुंभारकर, मच्छिंद्र कुंभारकर, हनुमंत कुंभारकर, संतोष हगवणे, मनेश हगवणे, किसन तात्या कुंभारकर, ग्रामपंचायत सदस्या राजश्री कुंभारकर, लंकेश महामुनी, महादेव कुंभारकर, शाळांमधील विद्यार्थी तसेच वनपुरी, उदाचीवाडी आणि पंचक्रोशीतील शेतकरी व महिल्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
खानवडी येथे सरपंच होले यांच्या मार्गदर्शनाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेळी उपसरपंच वैजयंता होले, सदस्य रामदास होले, वर्षा खोमणे, लक्ष्मण बोरावके, रवींद्र फुले, रामभाऊ नेवसे सचिन होले, भाऊ खोमणे, सुरेश होले, नवनाथ होले तसेच महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारगाव-मेमाणे येथील चौफुला येथे सरपंच सर्जेराव मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४ तास रस्ता रोको करून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी सरपंच जितेंद्र मेमाणे विठ्ठल मेमाणे, लक्ष्मण गायकवाड, नंदूसेठ मेमाणे, हरिभाऊ मेमाणे संदीप मेमाणे त्याचप्रमाणे शेकडो महिला, मुले गुरेढोरे घेऊन रस्त्यावर उतरली होती. या वेळी रस्त्यातच दगडी चूल मांडून त्यावर सरकारच्या दशक्रिया विधीचा स्वयंपाक करण्यात आला व त्यानंतर रस्त्यावरच जागरण-गोंधळ घालून ‘सरकारचे डोके ठिकाणावर येऊ दे’असे देवीला साकडेदेखील घालण्यात आले.
वनपुरी येथील निकिता हगवणे या विद्यार्थिनीने, स्त्रीशिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविणाºया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक जर विमानतळात जाणार असेल, तर त्यांची जयंती साजरी करून उपयोग काय? असा जळजळीत सवाल केला आहे.
>विमानतळाची जमीन ही शेतकºयांच्या मालकीची व हक्काची आहे. त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने शेतकºयांनी आपला विरोध व्यक्त केला आहे. परंतु, तरीही शासन दखल घेत नसेल तर भविष्यात सर्व आंदोलने आक्रमक पद्धतीने केली जातील. तसेच, यामध्ये शासनाने शेतकºयांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्यास पहिली गोळी मी झेलेन.
-बाबाराजे जाधवराव, प्रदेशाध्यक्ष, मनसे शेतकरी संघटना
>विमानतळाच्या नावावर सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी खेळत आहे. ज्यांच्या जमिनी आहेत, त्यांना विश्वासात का घेतले जात नाही? शेतकºयांच्या हक्काच्या जमिनीला हात लावाल, तर तो हात हेच शेतकरी जागेवर ठेवणार नाहीत.
- जालिंदर कामठे,
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष
यापुढे आंदोलन आणखी तीव्र केले जाणार आहे. आमचे म्हणणे विचारात न घेता शासन मुंबईमध्ये बसून एक-एक निर्णय घेत आहे; त्यामुळे जोपर्यंत विमानतळ प्रकल्प मागे घेत नाही, तोपर्यंत हटणार नाही.
- दत्तात्रय झुरंगे, अध्यक्ष (विमानतळविरोधी संघर्ष समिती)

Web Title: Purandar road to protest against the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे