पुरंदर तालुका : नीरेत १०८ रुग्णवाहिकेने दिले साडेतीन हजार जणांंना जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 01:20 PM2019-05-08T13:20:57+5:302019-05-08T13:24:45+5:30
गेल्या वर्षी अद्ययावत १०८ ही तातडीची रुग्णवाहिका नीरेत कार्यान्वित झाल्याने ३ हजार ५७७ रुग्णांना वर्षभरात उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले.
नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा आणि परिसरात सातत्याने होणारे अपघात, हृदयरोगाचा झटका किंवा अन्य घटनांमध्ये गोल्डन उपचाराअभावी अनेकांचे प्राण गेले होते. मात्र, गेल्या वर्षी अद्ययावत १०८ ही तातडीची रुग्णवाहिका नीरेत कार्यान्वित झाल्याने ३ हजार ५७७ रुग्णांना वर्षभरात उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले. सर्वाधिक गर्भवती, हृदयरोगींसह अपघातग्रस्तांना गोल्डन अवर्समध्ये वैद्यकीय सेवा मिळाल्याने त्यांना जीवदान मिळाले.
नीरा येथील पत्रकार पै. शमीम मुबारक आतार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने २६ जुलै २०१६ रोजी मृत्यू झाला. गोल्डन अवर्समध्ये त्यांना वेळीच उपचार मिळू शकले नाही. यामुळे नीरा आणि परिसरातील नागरिकांना गोल्डन अवर्समध्ये उपचार मिळावे यासाठी शमीम आतार यांच्या कुटुंबीयांनी ‘डायल १०८’ ही तातडीची रुग्णवाहिकेसाठी सरकारकडे प्रयत्न केले होते. त्याला यश आले. गेल्या वर्षी धर्मादाय आयुक्तालयाचे तत्कालीन आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. मुकुंदराव ननवरे यांच्या उपस्थितीत या रुग्णवाहिकेच्या सेवेचे उद्घाटन झाले होते. तेव्हापासून ही रुग्णवाहिका नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यान्वित झाली. या सेवेमुळे आता रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाले आहे, असा विश्वास परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. नीरा ग्रामपंचायतीने यासाठी सहकार्य केले होते.
* गेल्या वर्षी २२ एप्रिल २०१८ रोजी १०८ ही तातडीची रुग्णवाहिका सुरू झाली. तेव्हापासून एका वर्षात पुरंदर, बारामती, फलटण, खंडाळा तालुक्यातील नागरिकांना रुग्णसेवा देण्यात यश आले. एका वर्षात ३ हजार ५७७ रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक गर्भवती, अपघातग्रस्तांचा समावेश असून सुमारे ४३० जणांना जीवदान देण्यात आले. पुणेआणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात ही रुग्णवाहिका असल्याने श्री संत ज्ञानेश्वर
महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सर्वाधिक रुग्णांना उपचार देण्यास ही रुग्णवाहिका उपयुक्त ठरली. या सोहळ्या दरम्यान
* गेल्या वर्षी जुलै महिन्यात १ हजार ४४३ वारकºयांना उपचार देण्यात आले. वर्षभरात सर्वाधिक १ हजार ५८३ रुग्णांना विविध प्रकारचे वैद्यकीय उपचार देण्यात आल्याची अहवालात नोंद करण्यात आली, अशी माहिती १०८ रुग्णवाहिका सेवेच्यावतीने देण्यात आली.
* नीरा भागात १०८ या तातडीच्या वैद्यकीय सेवा देणारी रुग्णवाहिकेची गरज होती. वारंवार होणारे अपघात अथवा अन्य घटनांमुळे या सेवेची प्रतीक्षा होती. आरोग्य विभागाने ही सेवा सुरू केल्याने नीरा आणि परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होत आहे. अपघात अथवा अन्य घटनांवेळी वैद्यकीय उपचारासाठी या सेवेचा नागरिकांना फायदा घ्यावा.
-डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी
.........
पुरंदर तालुक्यातील नीरा हे गाव पुरंदर, बारामती, फलटण, खंडाळा या चार तालुक्यांच्या आणि पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे या भागात होणारे अपघात, गर्भवती अथवा हृदयरोगींना गोल्डन अवर्समध्ये यापूर्वी उपचार मिळणे अशक्य होते. आता या भागात १०८ ही तातडीची रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आल्याने या भागातील रुग्णांसह अपघातग्रस्तांना गोल्डन अवर्समध्ये उपचार देऊन प्राण वाचविणे शक्य झाले.
-डॉ. वेदव्यास मोरे, जिल्हा व्यवस्थापक
...........
* गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ही सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत २१ जणांना तातडीची सेवा देण्यात आल्याने त्यापैकी १५ गर्भवतींना वेळीच उपचार मिळाल्याने नवजात अर्भकांना जीवदान मिळाले. रुग्णवाहिका सुरू झाल्यापासून ते एप्रिल २०१९ पर्यंत नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात प्रत्येक महिन्यात अपघात झाले असून त्या ठिकाणी ही रुग्णवाहिका अवघ्या २० ते २५ मिनिटांत पोहोचली. त्यामुळे ११६ रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली.
* विषबाधा, वरून खाली पडणे, मारहाण, वैद्यकीय मदत यासारख्या विविध घटनांमध्ये रुग्णवाहिकेची सेवा देण्यात आली. त्या सेवेमुळे नीरा, जेजुरी, सासवड, त्याशिवाय सातारा जिल्ह्यातील पाडेगाव, लोणंद, फलटण, खंडाळा, तसेच बारामती तालुक्यातील निंबूत, वडगाव निंबाळकर, बारामती या भागातील रुग्णांना तातडीने रुग्णवाहिकेमुळे उपचार मिळू शकले, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. १०८ सेवेचे विभागीय व्यवस्थापक विठ्ठल बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व्यवस्थापक डॉ. वेदव्यास मोरे, डॉ. प्रियांक जावळे, तसेच रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल व्यवहारे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
.....