पुरंदरमध्ये निवडणुकीचे वारे, कार्यकर्ते लागले कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:12 AM2021-09-23T04:12:44+5:302021-09-23T04:12:44+5:30

-- येत्या वर्षभरात वेगवेगळ्या निवडणुका होत असल्याने पुरंदर तालुक्यात आता निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकांबाबत ...

In Purandar, the wind of elections, the workers started working | पुरंदरमध्ये निवडणुकीचे वारे, कार्यकर्ते लागले कामाला

पुरंदरमध्ये निवडणुकीचे वारे, कार्यकर्ते लागले कामाला

Next

--

येत्या वर्षभरात वेगवेगळ्या निवडणुका होत असल्याने पुरंदर तालुक्यात आता निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकांबाबत चाचपणी करू लागले आहेत.

येत्या वर्षभरात साखर कारखाना, पुणे जिल्हा बँक, सासवड जेजुरी नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती, खरेदी-विक्री संघ, मार्केट कमिटी आदी निवडणुका होणार आहेत. काही सहकारी सोसायट्या, ग्रामपंचायतींच्याही निवडणुका होणार आहेत. कोरोना महामारीच्या संकटामुळे लांबलेल्या निवडणुका आता घ्याव्याच लागणार आहेत. एकीकडे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्याने कदाचित निवडणुका लांबल्या ही जातील. मात्र, तयारीही व्हायलाच हवी. यासाठीच तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांशी बैठका, मेळावे घेऊ लागले आहेत.

सर्वांत पहिली सोमेश्वर साखर कारखान्याची, त्यापाठोपाठ जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे. त्यानंतर क्रमाक्रमाणे इतर निवडणुका होणार आहेत. गेल्या दोन वर्षांचा कोरोना संकटाचा काळ अत्यंत त्रासदायक गेल्याने सर्व पक्षीय मरगळलेल्या कार्यकर्त्यांच्या आता निवडणुकीचा ज्वर अंगात भरू लागला आहे. मरगळ झटकून कार्यकर्ते आता कामाला लागले आहेत, तर तालुका स्तरावरील पक्षीय नेतेही कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण करण्यासाठी गावोगावी बैठका घेऊ लागले आहेत. होणाऱ्या निवडणुकांमधून नेमके काय समोर येणार आहे, याची चर्चाही गावागावांतील पारावर रंगू लागली आहे. सत्तेच्या विरोधात असलेला हा तालुका आता सत्तेची चव चाखू लागल्याने गावागावांतील गावपुढरी आता नेटाने कामाला लागले आहेत. तालुक्यातील प्रमुख परस्पर विरोधी पक्ष यावेळी सत्तेत असल्याने होणाऱ्या निवडणुका कशा लढल्या जातील याचे अंदाज लावणे सुरू झाले आहे.

होऊ घातलेल्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची खुमखुमी सेनेकडून व्यक्त होत आहे. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर एकत्र येऊ. मात्र, काँग्रेसबरोबर न जाण्याचा सेनेचा निर्णय ठाम आहे. कार्यकर्त्यांची तशी भावना असल्याचेही समजते. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीही तुटणार नाही, हे संकेतही स्पष्ट आहेत. तिसरीकडे भाजप पक्षाची तालुक्यात तेवढी ताकद नसली तरीही भाजपकडून निवडणुकीत रंग भरले जाणार आहेत. भाजपकडूनही त्यांच्या पातळीवरून तशी मोर्चेबांधणी सुरू आहेच. यात दादा जाधवराव, बाबाराजे जाधवराव यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे एके काळचे खंदे समर्थक जालिंदर कामठे आणि राहुल शेवाळे यांची नेमकी चाल काय असणार यावर भाजपचे निबडणुकीतील अस्तित्व दिसणार आहे.

सत्तेतील प्रमुख असणारा काँग्रेस पक्ष आ. संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वच निवडणुकीत उतरणार आहे. निवडणुकीचे यशापयश सर्वस्वी त्यांच्याच निर्णयावर अवलंबून असणार आहे. तीच परिस्थिती शिवसेनेची आहे. माजी मंत्री विजय शिवतारे घेतील तो निर्णय सेना कार्यकर्ते शिरावर घेत निवडणुका लढणार आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य पक्षाच्या अनेक नेत्यांच्या हातात असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष मानला जातो. माजी आमदार अशोक टेकवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, माजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय कोलते, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताजी चव्हाण, बबूसाहेब माहूरकर, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांना या निवडणुकांतून एकजुटीने उतरावे लागणार आहे. मात्र, पक्षातील गटबाजीमुळे हा पक्ष नेहमीच मागे राहिलेला आहे. पक्ष नेतृत्वाची भूमिकाच या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळवून देऊ शकते हेही तितकेच निर्विवाद सत्य आहे.

येणारे वर्ष हे राजकीय पक्षांची परीक्षा घेणारे आहेच. शिवाय कोणाची किती ताकद तेही पुरंदरवासीयांना समजणार आहे. कोण किती पाण्यात आहे. कोणाचे किती प्राबल्य आहे, हे सर्व येणाऱ्या निवडणुकांतून दिसणार आहे.

--

चौकट

राज्यात दोस्ती, तालुक्याती कुस्ती

पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तीन ही पक्ष आता सत्तेत असल्याने होणाऱ्या निवडणुका या आघाडीतून होणार की, एकमेकांविरुद्ध लढल्या जाणार याचे मंथन कार्यकर्त्यांतून सुरू झाल्याने आता कोविडची भीती कोणालाही उरलेली दिसत नाही. कोरोना संकट आता कार्यकर्त्यांच्या लेखीही उरलेले नाही. फक्त एकमेकांविरुद्ध शड्डू थोपटून सर्वच जण तयारीला लागलेले दिसत आहेत. सर्वसामान्यांपर्यंत जाऊन आपला पक्ष कसा योग्य आहे हेच कार्यकर्ते सांगू लागले आहेत. पुरंदरची आजची राजकीय स्थिती पाहता गेल्या विधानसभा निवडणुकीच्या एकमेकांच्या विरोधात प्रचार करणारे कार्यकर्ते, तालुका पदाधिकारी होणाऱ्या निवडणुकांना कसे सामोरे जातात, याचीच चर्चा संपूर्ण तालुकाभर होत आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील सहभागी तीनही पक्षांचे कार्यकर्तेही तसे अजूनही संभ्रमात आहेत. पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेणार यावर निवडणुकांचे भवितव्य ठरणार आहे. एकीकडे राज्यात सत्तेत असणारे पक्ष तालुक्यात मात्र एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. त्यामुळे राज्यात दोस्ती व तालुक्यात कुस्ती, असे चित्र आहे.

Web Title: In Purandar, the wind of elections, the workers started working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.