रायगडावर पुस्तक पूजनासाठी गेलेल्या पुण्यातील 'त्या' व्यक्तींवर पुरंदरेंची अस्थी नेल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 07:12 PM2021-12-09T19:12:38+5:302021-12-09T19:13:20+5:30
मिश्रित लेप हे दिवंगत शिवप्रेमी बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी असल्याचा आरोप मराठा सेवक समितीच्या पुण्यातील कार्यकर्त्यानी केला आहे. परंतु त्या अस्थी नसून फुल, अष्टगंध, अत्तर यांचे मिश्रण असल्याचे सौरभ कर्डे याने लोकमतशी बोलताना सांगितले आहे.
पुणे/रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ले रायगडावरील समाधीला राख मिश्रित लेप लावणे आणि पुस्तकाचे पूजन करणाऱ्या दाेन पुण्यातील व्यक्तींना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. सौरभ कर्डे ( रा. कसबा पेठ, पुणे) आणि त्याच्या सहकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यांचा जबाब नाेंदवण्यात आला आहे, तसेच सापडलेले साहित्य रासायनिक विश्लेषण करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली. अस्थी मिश्रित लेप हे दिवंगत शिवप्रेमी बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी असल्याचा आरोप मराठा सेवक समितीच्या पुण्यातील कार्यकर्त्यानी केला आहे. परंतु त्या अस्थी नसून फुल, अष्टगंध, अत्तर यांचे मिश्रण असल्याचे सौरभ कर्डे याने लोकमतशी बोलताना सांगितले आहे.
बुधवारी 8 डिसेंबर राेजी दुपारी किल्ले रायगडावर पुण्याहून सौरभ आणि त्याचे मित्र आले हाेते. शिवप्रेमींना जगदीश्वर मंदिरा जवळच्या चौथऱ्यावर काही व्यक्तींच्या हालचाली या संशयास्पद असल्याचे आढळून आले. यामुळे त्यांनी या संशयास्पद व्यक्तींचा पाठलाग केला. चार ते पाच व्यक्ती या जगदिश्र्वर मंदिरा जवळच्या चौथऱ्यावर मंत्रोच्चार करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला लेप लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आराेप मराठा सेवक समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. याठिकाणी पुस्तकाचे पूजन देखील करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने त्यांना शिवप्रेमींनी रोखले होते. गडावर काही काळ तणावाचे वातावरण हाेते. त्यानंतर पाेलिसांना पाचारण करण्यात आले. असे काेणतेही कृत्य करण्यात आले नसल्याचे सौरभ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पाेलिसांना सांगितले. संशयित व्यक्तींचे महाड येथील तालुका पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यांच्याकडील राख मिश्रित लेप ताब्यात घेऊन रासायनिक विश्लेषण करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.
आम्ही नेहमी पुस्तक पूजनासाठी रायगडावर जातो
पुण्याच्या कसबा पेठेत राहणारा सौरभ कर्डे हा शिवव्याख्यान करतो. त्याने पुण्यात महाविद्यालये आणि इतर कार्यक्रमात शिवाजी महाराजांवर व्याख्याने दिली आहेत. तसेच शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीवर पुस्तकेही लिहिण्याचे त्याचे काम सुरु आहे. लोकमतने रायगडवरील या घटनेमुळे सौरभशी संवाद साधला. तेव्हा तो म्हणाला, ''आम्ही नेहमी नवीन पुस्तक पूजनासाठी रायगडावर जात असतो. यावेळी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर पुस्तक पूजनाला गेलो होतो. आमच्याजवळ पूजेसाठी चाफ्याची फुल, अष्टगंध, अत्तर, असे एकत्रीकरण केलेले मिश्रण होते. समाधीसमोर माझे नवीन पुस्तक ठेवून त्याची पूजा करणार होतो. तेवढ्यात या कार्यकर्त्या महिलांनी गडावर गोंधळ घातला. आरडाओरडा करून आम्ही पुरंदरे यांची अस्थी घेऊन आलो आहोत. असा आमच्यावर आरोप केला आहे. रायगडावर काही घडू नये म्हणून आम्ही शांततेत पोलीस स्टेशनला आलो आहोत. या प्रकरणाबाबत न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे.''